मुंबई : 18 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून नुकतीच ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली. या पार्श्वभूमीवर त्याची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तो कॉमेडियन आणि अभिनेत्री रुबी वॅक्सला अंडरवर्ल्डकडून आलेल्या धमक्यांविषयी सांगताना दिसत आहे. 90 च्या दशकात जेव्हा बॉलिवूड इंडस्ट्रीत शाहरुखची लोकप्रियता वाढत गेली, तेव्हा त्याला अंडरवर्ल्डकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या.
या जुन्या मुलाखतीत शाहरुख म्हणतो, “ते एक यंत्रणा निर्माण करतात आणि तुम्हाला त्यांचं ऐकावंच लागतं. कदाचित मी त्याला बळी पडलो नाही, पण ते तुमच्यावर गोळीही झाडू शकतात.” त्यावर वॅक्स शाहरुखला विचारते, “तू खरंच असं सांगतोय का, की माझ्या चित्रपटात काम कर अन्यथा मी गोळी झाडेन, अशी धमकी तुला मिळाली?” त्यावर होकारार्थी मान हलवत किंग खान पुढे म्हणतो, “होय, पण जितक्या नम्रतेने तू हे म्हणालीस, तितक्या नम्रतेने ते बोलत नाहीत.”
अंडरवर्ल्डसाठी फिल्म इंडस्ट्री हे सर्वांत सोपं लक्ष्य आहे आणि त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर असल्याचंही शाहरुखने सांगितलं. तुझ्या जिवाला कधी धोका होता का, असा प्रश्न विचारला असता शाहरुख म्हणाला, “होय, अनेकदा… मी तीन वर्षे प्रचंड सुरक्षेखाली होतो.” शाहरुखला गँगस्टर अबू सालेमकडून अनेकदा धमक्या मिळाल्या होत्या. पत्रकार अनुपमा चोप्रा यांच्या ‘किंग ऑफ बॉलिवूड: शाहरुख खान’ या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
“तो मला म्हणायचा की मी तुला पाहू शकतो. त्यामुळे सतत आपल्याला कोणीतरी पाहत असल्याची भीती मला होती. ते फारच निराशाजनक आणि भीतीदायक होतं. मला काही दिवस घरीच राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला होता. त्यावेळी माझं घर लहान होतं. ते संपूर्ण वातावरण खूप त्रासदायक होतं”, असं शाहरुखने सांगितलं होतं.
‘कांटे’, ‘काबिल’, ‘शूटाऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूटाऊट ॲट वडाला’ आणि ‘जज्बा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी शाहरुखबद्दल ट्विट करत अंडरवर्ल्डकडून मिळालेल्या धमक्यांचा खुलासा केला होता. ‘नव्वदच्या दशकात जेव्हा फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींवर अंडरवर्ल्डचा दबाव होता, त्यावेळी शाहरुख खान हा एकमेव कलाकार होता, ज्याने कधीच हार मानली नाही. गोळी घालायची असेल तर घाला, पण तुमच्यासाठी मी काम करणार नाही. मी पठाण आहे, असं तो थेट म्हणायचा,’ असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.