अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास याला ठाण्यातून अटक करण्यात आली. हा आरोपी बांगलादेशी असून घुसखोरी करून आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. या आरोपीला रविवारी वांद्र्यातील एका कोर्टात हजर केल्यानंतर अजब परिस्थिती उद्भवल्याचं पहायला मिळालं. कारण त्याची वकिली करण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले. अशा परिस्थितीत अखेर मॅजिस्ट्रेटना मध्यस्थी करावी लागली. अखेर उपाय म्हणून मॅजिस्ट्रेटने दोन्ही वकिलांना मिळून आरोपीची वकिली करण्याचा सल्ला दिला. सैफ अली खानवरील हल्ल्याचं हे प्रकरण हाय प्रोफाइल असल्याने दोन्ही वकिलांकडून केस मिळवण्यासाठी खटाटोप सुरू होता.
आरोपी मूळचा बांगलादेशातील राजाबरीया गावचा रहिवासी आहे. भारतात आल्यावर तो विजय दास असं नाव बदलून राहत होता. जवळपास सहा महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला आणि ठाण्यातील एका हॉटेलमध्ये काम करत होता, परंतु त्याने सुमारे पंधरवड्यापूर्वी ती नोकरी सोडली आणि काम शोधत होता, असं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याला रविवारी दुपारी वांद्रे इथल्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाकडून त्याला विचारण्यातथ आलं की पोलिसांविरुद्ध काही तक्रारी आहेत का? त्यावर शहजादने नकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर त्याला कोर्टरुमच्या मागच्या बाजूला आरोपींसाठी असलेल्या एका चौकटीजवळ नेण्यात आलं.
ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर एक वकील शहजादची बाजू मांडत असल्याचा दावा करत पुढे आला. परंतु ‘वकलतमन’वर (वकील खटल्यात हजर राहण्यासाठी अधिकृत करणारा कायदेशीर दस्तऐवज) आरोपीची स्वाक्षरी घेण्यापूर्वीच कोर्टात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. आणखी एक वकील आरोपीच्या चौकटीत धावत गेला आणि त्याने त्याच्या वकलतमनावर शहजादची सही घेतली. यामुळे कथित हल्लेखोराची बाजू कोण मांडणार याबद्दल गोंधळ निर्माण झाला. अखेर हा गोंधळ मिटवण्यासाठी दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही वकिलांना शहजादचं प्रतिनिधित्व करण्याची सूचना केली. “तुम्ही दोघंही वकिली करू शकता”, असं दंडाधिकाऱ्यांनी सांगताच वकिलांनी सहमती दर्शवली. त्यानंतर न्यायालयाने शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
16 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपीने सैफवर त्याच्यात घरात चाकूने हल्ला केला. आरोपीने सैफवर सहा वार केले आणि तो पळून गेला होता. त्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सैफची प्रकृती आता स्थिर असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो.