तुला वडील नाहीत..; एकता कपूरने स्वत:च्या मुलाला सांगितलं सत्य

| Updated on: Dec 30, 2024 | 2:17 PM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर ही 2019 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई बनली. एकताने तिच्या वडिलांच्या मूळ नावावरून तिच्या मुलाचं नाव रवी असं ठेवलंय. एका मुलाखतीत ती एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

तुला वडील नाहीत..; एकता कपूरने स्वत:च्या मुलाला सांगितलं सत्य
एकता कपूर आणि तिचा मुलगा रवी कपूर
Image Credit source: Instagram
Follow us on

गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी एकल पालकत्व स्वीकारलंय. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता तुषार कपूर, निर्माती एकता कपूर यांनी सरोगसीद्वारे पालक बनण्याचा पर्याय निवडला. एकता कपूर 2019 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाची आई झाली. रवी कपूर असं तिच्या मुलाचं नाव आहे. वडील आणि दिग्गज अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या मूळ नावावरून एकताने तिच्या मुलाचं नाव ठेवलंय. एका मुलाखतीत एकता तिच्या या नव्या जबाबदारीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

“माझ्या आयुष्यात खूप लोकं आहेत, जे मला सतत सल्ले देत असतात. मी तर माझ्या मुलाशीही संवाद साधते. तो जेव्हा सात महिन्यांचा होता, तेव्हाच मी त्याला सांगितलं होतं की तुला वडील नाहीत आणि मी तुझ्यासोबतच शिकतेय. अर्थात माझ्या मनात अपराधीपणाची भावनासुद्धा आहे. पण परफेक्शन हे मृगजळासारखं आहे आणि मी परफेक्ट आई नाही”, असं ती म्हणाली होती. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये तिने खुलासा केला होता की आई बनण्यासाठी ती सात वर्षांपासून प्रयत्न करत होती. या सात वर्षांत तिच्या डॉक्टरने तिला विविध पर्याय सुचवले होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान एकता कपूर दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्याही चर्चा आहेत. एकता सरोगसीच्या माध्यमातूनच दुसऱ्यांदा आई होण्यासाठी प्रयत्न करतेय, असं वृत्त ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने दिलं होतं. मात्र या वृत्तानंतर एकता कपूरच्या जवळच्या सूत्रांनी त्यात काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. “हे वृत्त हास्यास्पद आणि अत्यंत चुकीचं आहे”, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

याआधी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. 2017 मध्ये तो सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा पिता बनला. आई हिरू यांच्यासोबत मिळून तो त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतोय. मात्र मुलं जेव्हा त्याला त्यांच्या आईविषयी प्रश्न विचारतात, तेव्हा काय उत्तर द्यावं, असा प्रश्न करणलाही पडतो. मुलांच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन घ्यावं लागत असल्याचं तो म्हणाला होता. एकता कपूरचा भाऊ आणि अभिनेता तुषार कपूरनेही सरोगसीचा पर्याय निवडला. 2016 मध्ये तो सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाचा पिता बनला. तुषारच्या मुलाचं नाव लक्ष्य असं आहे.