‘त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम..’, ईशा देओलने सांगितलं अजय देवगणसोबतच्या नात्याचं सत्य

| Updated on: Mar 20, 2025 | 9:16 AM

अभिनेत्री ईशा देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजय देवगणसोबतच्या डेटिंगच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे. अजयसोबत तिचं नातं कसं आहे, याविषयीही तिने खुलासा केला. अजय आणि ईशाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम.., ईशा देओलने सांगितलं अजय देवगणसोबतच्या नात्याचं सत्य
Esha Deol and Ajay Devgn
Image Credit source: Instagram
Follow us on

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने 2002 मध्ये बॉलिवूडमधील तिच्या करिअरची सुरुवात केली होती. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं आणि आता तब्बल 14 वर्षांनंतर ती कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या खासगी आयुष्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. करिअरच्या सुरुवातीला ईशाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. त्यापैकीच एक नाव होतं अभिनेता अजय देवगणचं. अजय देवगणसोबतच्या डेटिंगच्या चर्चांमागचं सत्य अखेर ईशाने या मुलाखतीत सांगितलं आहे.

‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “माझ्याबद्दलच्या काही चर्चा कदाचित खऱ्या असतील किंवा काही खोट्या असतील. त्यांनी माझं नाव अजय देवगणसोबतही जोडण्याचा प्रयत्न केला होता. माझं अजयसोबत खूप सुंदर आणि वेगळं नातं आहे. या नात्यात आदर, प्रेम आणि एकमेकांविषयी कौतुक आहे. त्यामुळे त्या चर्चा खूप विचित्र होत्या. त्यावेळी आम्ही कदाचित एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करू लागलो होतो, म्हणून चर्चांना हवा मिळाली.”

हे सुद्धा वाचा

ईशा आणि अजय यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या होत्या. ‘युवा’, ‘मैं ऐसा ही हूँ’, ‘काल’, ‘इन्सान’ आणि ‘कॅश’ या चित्रपटांमध्ये अजय आणि ईशाने स्क्रीन शेअर केला होता. त्यानंतर 2022 मध्ये ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्येही दोघं पुन्हा एकत्र झळकले. या सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलरमध्ये राशी खन्ना, अतुल कुलकर्णी आणि आशिष विद्यार्थी यांच्याही भूमिका होत्या. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज स्ट्रीम झाली होती.

ईशा लवकरच डॉ. अजय मुर्डिया यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय हे देशभरात फर्टिलिट क्लिनिक्सची साखळी असणाऱ्या इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक आहेत. यामध्ये अदा शर्मा, अनुपम खेर, इश्वाक सिंह आणि ईशा देओल यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ईशा देओल गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ती पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली. ईशा आणि भरत तख्तानी यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना मिराया आणि राध्या या दोन मुली आहेत.