मुंबई : 6 मार्च 2024 | स्टार प्लस वाहिनीवरील ‘ईमली’ या मालिकेतून अभिनेता फहमान खान लोकप्रिय झाला. त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मालिकेत आर्यन सिंह राठोडची भूमिका साकारणारा फहमान हा ‘बिग बॉस 16’मध्ये पाहुणा म्हणूनही गेला होता. फहमानविषयी प्रेक्षकांना बरंच काही माहीत आहे, मात्र त्याचा सख्खा भाऊ फराज खान हा बॉलिवूड अभिनेता होता, हे फार क्वचित लोकांना माहीत असेल. एका मुलाखतीत बोलताना फहमान त्याच्या भावाविषयी व्यक्त झाला. फराजवर रुग्णालयात 28 दिवस उपचार सुरू होते. त्याच्या निधनाविषयीही बोलताना फहमान भावूक झाला होता.
“निधनापूर्वी माझा भाऊ 28 दिवसांपर्यंत रुग्णालयात होता. ब्लॅक फंगसमुळे त्याचा जीव गेला. कोविडदरम्यान त्याचं निधन झालं होतं. त्यावेळी हा नवीन व्हायरस पसरलाय हे कोणालाच माहीत नव्हतं. त्याचा शोध लागण्याच्या सहा महिन्याआधीच भावाचे प्राण गेले. तो रुग्णालयात असताना आम्ही विविध प्रकारे स्वत:ची समजूत घालत होतो. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. कोविडदरम्यान ब्लॅक फंगस नावाचा नवीन व्हायरस पसरलाय हे अनेकांना माहितच नव्हतं”, असं फहमान म्हणाला.
भावाविषयी तो पुढे म्हणाला, “सुरुवातीच्या दिवसांतील माझं छोटं-छोटं यश भावाने पाहिलंय. थिएटरमध्ये काम करणं, मुंबईला येणं, शोज करणं हे सर्व त्याने पाहिलंय. मला कोणतीही अडचण आली तर मी त्याच्याशी बोलायचो. माझ्या करिअरमधील उत्तम भाग पाहण्यासाठी तो इथे असता तर खूप खुश झाला असता. पण त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं की तो मला करिअरमध्ये मदत करणार नाही. तो म्हणाला की तुला माझ्या कोणत्याही मित्रांची मदत हवी असेल तर घे, पण मी मदतीसाठी कोणालाच कॉल करणार नाही. तेव्हा मला वाईट वाटलं होतं, पण माझ्या जीवावर मी सर्वकाही करावं अशी त्याची इच्छा होती. मी ते करू शकतो असा त्याला विश्वास होता.”
फहमानने भावासोबतचं शेवटचं बोलणं फोनमध्ये रेकॉर्ड केलंय. पण त्यावेळी आजारपणामुळे त्याचा भाऊ त्याला ओळखू शकत नव्हता. “तो संवाद हृदय पिळवटून टाकणारा होता. मी ‘अपना टाइम आएगा’साठी शूटिंग करत होतो आणि त्याने मला माझ्या कामाबद्दल विचारलं. सर्वांत आधी त्याने माझं नाव विचारलं की तू शियाजच आहेस ना? शियाज हे माझं टोपणनाव आहे. जी व्यक्ती आयुष्यभर माझ्यासाठी माझा आत्मविश्वास होती, ती माझं नावंही विसरून गेल्याचं पाहून मला धक्का बसला होता”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.