‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत रोशन सिंग सोढी भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या 23 दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलीस सतत अभिनेत्याच्या कुटुंबियांची आणि मित्रांची चौकशी करत आहेत. अभिनेत्याच्या वडिलांची अवस्था देखील वाईट आहे. दरम्यान पोलिसांचा तपास सुरु असताना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेता फैझान खान याने मोठा दावा केला आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी गुरुचरण याने कट रचला आहे. एवढंच नाहीतर, गुरुचरण सिंग याची तुलना अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत देखील करण्यात आली आहे.
फैझान खान म्हणाला, ‘मला याबद्दर फार काही माहिती नव्हतं. मी मालिका पाहात नाही. माझ्या मित्राने मला एक लिंक पाठवली ज्यामध्ये गुरुचरण बेपत्त असल्याची माहिती मला मिळाली. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की, गुरुचरण सिंग याने दिल्लीत बेपत्ता झाल्याची बातमी जाणीवपूर्वक प्रसिद्ध केली. त्यानंतर त्याने स्वतःचा फोन पंजाब येथील एका ठिकाणी सोडला. हे सर्व कशासाठी फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी? मला कळत नाही की टीव्ही इंडस्ट्रीतील लोकं असं का करणतात?’ असा प्रश्न देखील अभिनेत्याने उपस्थित केला.
‘यामध्ये किती मेहनत लागते. दिल्ली पोलीस, पंजाब पोलीस, मुंबई पोलीस… अभिनेत्याचा तपास करत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकारांची देखील पोलिसांनी चौकशी केली. प्रसिद्धीसाठी असं करणं अत्यंत चुकीचं असून इंडस्ट्रीवर मोठा डाग आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनी स्वत:ला मोठे सेलिब्रिटी समजू नये.’
‘गुरुचरण सिंग तर एक सरदार आहे आणि सरदार असं कधीच करत नाहीत. जेव्हा लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण दरवाजे खिडक्या बंद करून बसले होते, तेव्हा सरदार रस्त्यावर उतरुन गरिबांसाठी जेवण वाटायचे. कोणाला उपाशी पोटी सरदारांनी राहू दिलं नाही.’
एवढंच नाही तर, फैझान खान याने गुरुचरण सिंग याची तुलना अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत देखील केली. ‘प्रसिद्धीसाठी पूनम पांडे हिने देखील स्वतःच्या निधनाची खोटी बातमी पसरवली. असे कलाकार इंडस्ट्रीचं नाव खराब करत आहेत. माझ्या दृष्टीने हे चुकीचं आहे. याविरोधात कारवाई होण्याची गरज आहे. अशा लोकांना इंडस्ट्रीतून बायकॉट करायला हवं…’ सध्या सर्वत्र गुरुचरण याची चर्चा रंगली आहे. अभिनेता बेपत्ता असल्यामुळे चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत.