Radikaa Sarathkumar On Malayalam Film Industry: न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. रिपोर्ट समोर आल्यानंतर अभिनेत्री आणि इंडस्ट्रीतील अन्य महिला त्यांच्यावर झालेले शारीर, लैंगिक आणि मानसिक शोषण यावर आवाज उठवताना दिसत आहे. आता दिवंगत अभिनेते ऋषी कपूर स्टारर ‘नसीब अपना – अपना’ सिनेमातील अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी देखील मोठा खुलासा केला आहे. महिलांच्या व्हॅनिटी व्हॅमध्ये हीडन कॅमेरे लावल्याचा खुलासा राधिका सरथकुमार यांनी केला आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राधिका सरथकुमार यांनी मल्याळम इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘केरळमध्ये जेव्हा मी एका सिनेमाचं शुटिंग करत होती, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, काही लोकं एका ठिकाणी जमा होवून काही तरी पाहात आहेत. तेव्हा मी एका क्रू मेंबरला विचारलं, कसला गोंधळ सुरु आहे तिकडे? तेव्हा त्याने मला सांगितलं व्हॅनमध्ये हीडन कॅमेरे आहेत. त्या कॅमेऱ्यांमध्ये महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले जात आहेत.’
‘ती व्यक्ती मला म्हणाली, फक्त अभिनेत्रीचं नाव टाईप करा आणि कपडे बदलण्याचा व्हिडीओ सुरु होतो. मी देखील व्हिडीओ पाहिला आहे.’ घटना नक्की कुठे घडली याबद्दल अभिनेत्रीने काही सांगितलं नाही. ‘आपण त्यांच्यावर थुंकले तर ते आपल्या अंगावर पडेल. त्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही…’
इंडस्ट्रीमधील सत्य माहिती झाल्यानंतर राधिका सरथकुमार यांना मोठा धक्का बसला. स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाण्यासाठी देखील त्यांनी भीती वाटत होती. राधिका म्हणाल्या, ‘घडलेल्या घटनेबद्दल मी अन्य महिलांना देखील याबद्दल सांगितलं. महिला कलाकारांनी हीडन कॅमेऱ्यांबद्दल सांगितलं. त्यानंतर मला स्वतःला व्हॅनमध्ये जायची भीती वाटू लागली. व्हॅनिटी व्हॅन म्हणजे कपडे बदलण्यासाठी, आराम करण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी खासगी जागा असते…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका सरथकुमार यांनी सांगितलेल्या धक्कादायक घटनेची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या लैंगिक छळाचे भयानक अनुभव शेअर करण्यासाठी पुढे आल्या आहेत. यामध्ये सीपीआय(एम) आमदार आणि अभिनेता मुकेश, अभिनेते जयसूर्या, एडावेला बाबू तसेच मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रंजित यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. यांच्याशिवाय देखील अनेकांवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आहेत.