मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | झगमगत्या विश्वात कलाकारांना ठराविक वेळेत मालिका किंवा सिनेमाचं शूट पूर्ण करावं लागतं. ज्यामुळे कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. सेलिब्रिटींना शुटींगमुळे अनेक दिवस – महिने कुटुंबापासून दूर राहावं लागतं. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात देखील अनेक चढ – उतार येत असतात. खासगी आयुष्य बाजूला ठेवून सेलिब्रिटींना शूट करावं लागतं. मालिकेचं शुटींग असेल तर, आणखी अडचणी येत असतात. टीव्ही विश्वातील एका अभिनेत्रीसोबत अशीच एक घटना घडली आहे. जेव्हा अभिनेत्रीला मिसकॅरेजनंतर तात्काळ मालिकेच्या शूटसाठी बोलावण्यात आलं.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहेत, ती अभिनेत्री आज राजकारणात सक्रिय असते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या खासगी आयुष्याबद्दल सध्या चर्चा रंगत आहे. स्मृती इराणी आज टीव्ही विश्वातून दूर असल्या तरी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिके दरम्यान स्मृती इराणी यांचं गर्भपात झालं होतं. मालिकेत अभिनेत्री अपरा मेहता यांनी स्मृती इराणी यांच्या सासूबाईंची भूमिका बजावली होती. सध्या अपरा मेहता ‘अनुपमा’ मालिकेत गुरु माँ भूमिकेला न्याय देताना दिसत आहेत. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम देखील मिळत आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अपरा मेहता म्हणाल्या, ‘टीव्ही कलाकारांच्या खासगी आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी त्यांना सर्वकाही विसरुन शूटसाठी जावं लागतं. कारण प्रॉडक्शन पुढील एपिसोड शूट करुन ठेवत नाहीत.’
काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी एक मोठा खुलासा केला होता. ‘गर्भपातानंतर मला शूटींगसाठी जावं लागलं. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेदरम्यान मी माझं बाळ गमावलं होतं. पण तरी देखील मला शुटींगसाठी बोलावलं.’
स्मृती इराणी यांच्या दाव्यावर अपरा मेहता म्हणाल्या, ‘जेव्हा ही घटना घडली होती. तेव्हा मालिकेतील माझ्या भूमिकेचं महत्त्व राहिलं नव्हतं. पण त्या घटनेबद्दल मला माहिती होतं. स्मृती इराणी यांना मालिकेच्या शूटिंगसाठी जावं लागलं होतं…’ सध्या सर्वत्र अपरा मेहता यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
पुढे अपरा मेहता म्हणाल्या, ‘टीव्ही सेलिब्रिटींच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. पण यात कोणाचा दोष नाही. त्यानंतर लेकीच्या जन्मानंतर चार दिवसांत स्मृती इराणी शुटिंगसाठी परतली होती. मालिकांमध्ये रोज काहीतरी नवीन होत असतं. म्हणून स्मृती इराणी यांच्यासोबत नाही तर, प्रत्येक अभिनेत्रीला या गोष्टीची सामना करावा लागतो…’ असं देखील अपरा मेहता म्हणाल्या.