बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानची आई मेनका इराणी यांचं 26 जुलै रोजी निधन झालं होतं. त्या 79 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनाच्या काही दिवसांनंतर आता फराहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. आईसोबत लहानपणीचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट करत फराहने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे लवकरच कामावर परतणार असल्याचंही तिने म्हटलंय. मेनका या अभिनेत्री डेझी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहीण होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. रुग्णालयात त्यांच्यावर उपचारसुद्धा सुरू होते. मात्र त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नव्हत्या. आपला 79 वा वाढदिवस साजरा केल्याच्या दोन आठवड्यांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
आईसोबतचे जुने फोटो पोस्ट करत फराहने लिहिलं, ‘माझी आई खूप अनोखी होती. तिला कधीच प्रकाशझोतात राहायला किंवा चर्चेत राहायला आवडायचं नाही. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच संघर्षाला सामोरं गेल्यानंतरही तिच्या मनात कधीच कोणाविषयी कटुता किंवा द्वेष नव्हता. तिचं व्यक्तिमत्त्व खरंच दुर्मिळ होतं. तिला भेटलेल्या आणि तिच्यावर प्रेम केलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट समजली असेल की आमच्यात विनोदबुद्धी कुठून आली? अर्थातच आम्ही तिच्या तुलनेत खूपच मागे आहोत. साजित आणि माझ्यापेक्षाही ती खूपच विनोदी होती.’ या पोस्टमध्ये फराहने त्या सर्वांचे आभार मानले, ज्यांनी या कठीण काळात तिची साथ दिली.
‘तिचे सहकारी, आमच्या घरात काम करणारे लोक माझ्याजवळ येऊन सांगू लागले होते की आईने कशाप्रकारे त्यांची आर्थिक मदत केली होती. त्या पैशांच्या परतफेडीचीही अपेक्षा तिने त्यांच्याकडून केली नव्हती. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि नर्सेसचे मी खूप आभार मानते. आता पुन्हा कामावर परतण्याची वेळ झाली आहे. आमचं काम, ज्यावर तिला खूप अभिमान होता. माझ्या हृदयात कायम राहणारी ही वेदना भरून काढण्यासाठी मला वेळ नकोय. मला तिची आठवण काढायची नाहीये, कारण ती नेहमीच माझ्या आयुष्याचा भाग असेल. आता यापुढे मी आणखी शोक व्यक्त करणार नाही. मला प्रत्येक दिवशी तिला साजरं करायचं आहे’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
मेनका यांनी 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचपन’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनीसुद्धा भूमिका साकारली होती. मेनका यांनी निर्माते कामरान यांच्याशी लग्न केलं. या दोघांना फराह आणि साजिद ही दोन मुलं आहेत. पतीच्या निधनानंतर मेनका यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता.