माझ्या घटस्फोटाबद्दल मुलींच्या मनात आजही राग..; फरहान अख्तरचा खुलासा

| Updated on: Sep 22, 2024 | 2:34 PM

फरहान अख्तरने 2000 मध्ये अधुना भभानीशी लग्न केलं होतं. फरहान आणि अधुना यांनी लग्नाच्या 15 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये हे दोघं कायदेशीररित्या विभक्त झाले. घटस्फोटानंतर अधुनाने दोन्ही मुलांचा सांभाळ केला.

माझ्या घटस्फोटाबद्दल मुलींच्या मनात आजही राग..; फरहान अख्तरचा खुलासा
फरहान अख्तर आणि त्याच्या दोन मुली
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरने शिबानी दांडेकरशी दुसरं लग्न केलं. त्याआधी 16 वर्षांच्या संसारानंतर त्याने अधुनाला घटस्फोट दिला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या घटस्फोटाचा दोन्ही मुलींवर काय परिणाम झाला, याविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला. फरहान आणि अधुना यांना शक्या आणि अकिरा या दोन मुली आहेत. “आईवडिलांच्या घटस्फोटाचा परिणाम मुलांवर होतोच. आमचं नातं तुटल्यामुळे त्यांच्या मनात काही अंशी राग किंवा नाराजी असणं हे मी पूर्णपणे समजू शकतो”, असं तो म्हणाला.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फरहानला त्याच्या घटस्फोटाचा मुलांवर काय परिणाम झाला, याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना फरहान म्हणाला, “अर्थातच, घटस्फोट पचवणं कोणासाठीच सोपं नसतं. कारण अखेर जे नातं त्यांना खूप पक्कं आणि परफेक्ट वाटत असतं, त्यालाच तडा जातो. त्यामुळे काही अंशी मनात राग, नाराजी असतेच. मला आजही माझ्या मुलींमध्ये काही अंशी राग किंवा नाराजी असल्याचं जाणवतं. पण ते मोकळेपणे व्यक्त करत नाहीत. थोडं दु:ख, थोडी नाराजी त्यांच्यात आहेच. ही गोष्ट वेळेनुसारच ठीक होऊ शकते. वेळ आणि संवाद या दोन गोष्टींमुळे नात्यात थोडा समजूतदारपणा येऊ शकतो.”

हे सुद्धा वाचा

मुलींसाठी मनात खूप अपराधीपणाची भावना असल्याचंही फरहानने या शोमध्ये व्यक्त केलं. “मला त्यांच्याबद्दल खूप अपराधीपणा वाटतो. अधुना आणि माझ्या घटस्फोटाचं त्यांच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. तरीही त्यांना त्याचा फटका सहन करावा लागला. याचं खूप वाईट वाटतं”, असं फरहान पुढे म्हणाला.

फरहाननेही त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटाचं दु:ख सहन केलं होतं. फरहानचे वडील आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी 1985 मध्ये पत्नी हनी इराणीला घटस्फोट दिला होता. त्यापूर्वीच 1984 मध्ये त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. “आईवडिलांचं विभक्त होणं काय असतं हे मी सहन केलं होतं आणि माझी अशी खूप भावना होती की माझ्या मुलांसोबत मी असं काही घडू देऊ शकत नाही. मी आणि अधुना मिळून त्यांच्यासोबत याविषयी मोकळेपणे आणि प्रामाणिकपणे बोललो. त्यांना समजावलं की आम्ही हे पाऊल का उचलतोय, यामागच्या कारणाचं तुमच्याशी काहीच देणंघेणं नाही. आम्ही हा निर्णय त्यांच्यामुळे नाही, त्यांनी जे केलं त्याच्यामुळेही नाही किंवा ते जन्माला आले म्हणूनही नाही घेतला”, असं फरहान म्हणाला होता.