मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय सिनेमा निर्मात्याचं रस्ते अपघातात निधन झालं आहे. राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. निधन झालेल्या दिग्दर्शकाचं नाव पियुष पाल आहे. अपघातानंतर पियुष जवळपास 20 मिनिटं तडफडत होता. पण त्याचे प्राण वाचवण्यासाठी जमलेल्यांपैकी कोणीही पुढाकार घेतला नाही. पियुष याला जखमी अवस्थेत पाहून प्रत्येक जण त्याचा व्हिडीओ काढत होते. एक असंवेदनशील गोष्ट म्हणजे, त्याठिकाणी थांबलेल्या कोणीही जखमी पीयुष पाल याला मदत केली नाही, तर त्याचा मोबाईल आणि कॅमेरा कोणीतरी चोरल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपासणी करत आहेत. पियुष याला रस्त्यावर जखमी अवस्थेत पाहून पोलीस धावले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांना पियूष याला मृत घोषीत केलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.
अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे
संपूर्ण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पियूष त्याच्या बाईकवरून येताना दिसत आहे. तेव्हा एका दुचाकीस्वाराने पियूषच्या गाडीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर पीयूष जवळपास 20 मिनिटं तिथेच पडून होता, पण तिथे उपस्थित असलेले लोक व्हिडिओ आणि फोटो काढू लागले… एवढंच नाही तर, त्याच्या महागड्या वस्तू देखील लोकांनी चोरल्या आहेत.
पियुषच्या मित्रांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. मित्र म्हणाले, ‘तो सुमारे 20 मिनिटं जखमी अवस्थेत तिथेच पडून होता. त्याला अशा अवस्थेत पाहून एका व्यक्तीनेही संवेदनशीलता दाखवून मदत केली असती तर त्याचे प्राण वाचू शकले असते. परंतु, त्याला कोणी मदत तर नाही केली, पण त्याचं सामान चोरलं. अपघातानंतर पियुष याचा मोबाईल आणि महागडा कॅमेरा कोणीतरी चोरल्याची माहिती समोर येत आहे.