Sunny Deol viral video : अभिनेता सनी देओलचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो दारूच्या नशेत रस्त्यावर थिरकताना दिसत होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर इतका व्हायरल झाला की, त्यावर सनी देओलला नंतर स्पष्टीकरण द्यावं लागलं. सनी देओलने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चित्रपटाच्या एका सीनचे शूटिंग करताना दिसत आहे. त्याच्या आगामी ‘सफर’ चित्रपटासाठी रस्त्याच्या मधोमध हा सीन शूट केला जात होता. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत त्या व्हायरल व्हिडिओबद्दल सांगितले आहे.
सनीने त्याच्या व्हायरल झालेल्या मद्यधुंद व्हिडिओवर सांगितले की, “हे एका शूटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. जर मला मद्यपान करावे लागले तर मी ते रस्त्यावर किंवा ऑटोरिक्षात करेल का? मी पीतच नाही. हा खरा व्हिडिओ नसून चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडिओ आहे.”
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच सनीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्याला क्रू मेंबर्सनी घेरले होते. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे की, “अफवांचा प्रवास फक्त इथपर्यंत.”
Afwaahon ka ‘Safar’ bas yahin tak 🙏🙏#Shooting #BTS pic.twitter.com/MS6kSUAKzL
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2023
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सनी देओल रात्री सुनसान रस्त्यावर थिरकत होता. तेवढ्यात एक ऑटोचालक येतो आणि त्यांना लिफ्ट देतो. ऑटोचालक दारूच्या नशेत असलेल्या अभिनेत्याला रिक्षात बसवतो. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या.
सनी देओलने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, तो दारू पीत नाही. अभिनेता म्हणाला होता, “नाही, मी हा प्रयत्न केला नाही, मी इंग्लंडला गेल्यावर प्रयत्न केला, पण मला समजले नाही की दारू इतकी कडू आहे, वास इतका वाईट आहे आणि नंतर डोके दुखते, त्यामुळे ती का प्यावी? त्याचा काही अर्थ नव्हता, म्हणून मी पुन्हा कधीच प्यायलो नाही.”