मुंबई- मल्याळम अभिनेता श्रीनाथ भासी (Sreenath Bhasi) सध्या कायद्याच्या कचाट्याच अडकला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथवर भर मुलाखतीत (Interview) एका महिला पत्रकारासोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत घडलं. त्यानंतर संबंधित महिला पत्रकाराने श्रीनाथ भासीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्राराची दखल घेत पोलिसांनी त्याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
श्रीनाथ त्याच्या आगामी ‘चट्टंबी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होता. याच प्रमोशननिमित्त त्याने ही मुलाखत दिली होती. मात्र मुलाखतीदरम्यान मध्येच तो पत्रकाराला शिवीगाळ करू लागला. यामागचं कारण संबंधित पत्रकाराने विचारलेला प्रश्न असल्याचं म्हटलं जातंय. पत्रकाराने त्याला असा काही प्रश्न विचारला की श्रीनाथचा पाराच चढला आणि त्याने शिवीगाळ करत कॅमेरा बंद करण्याची मागणी केली.
श्रीनाथने शिवीगाळ करत गैरवर्तणूक केल्याची तक्रार संबंधित पत्रकाराने पोलिसांकडे केली. यानंतर मराडु पोलीस ठाण्यात श्रीनाथविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीनाथचा याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो एका पुरुष पत्रकाराला शिवीगाळ करताना दिसला होता.
घडलेल्या घटनेनंतर श्रीनाथने रविवारी माफी मागितली. “मी खूपच तणावात होतो. पण मी माझ्या वर्तनाचं समर्थन करत नाही. जे घडलं ते चुकीचंच होतं. मी चुकलो आणि त्यासाठी मी माफी मागतो”, असं तो म्हणाला.
माफी मागताना श्रीनाथने स्वत: पीडित असल्याचा बचावही केला. “त्यांनी माझा अपमान केला आणि स्वत: पीडित असल्याचं दाखवलं. पण हे योग्य नाही. इथे मी खरा पीडित व्यक्ती आहे. त्यांनी माझं नाव, माझा सिनेमा, माझा आनंद आणि लोकांचं माझ्यावर असलेलं प्रेम.. हे सर्व उद्ध्वस्त केलं. कदाचित आत्महत्या करणं माझ्यासाठी सोपं असतं. ते खूश झाले असते”, असं वक्तव्य त्याने केलं.