मुंबई : 10 जानेवारी 2024 | नयनताराची मुख्य भूमिका असलेल्या ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. चित्रपटात प्रभू श्रीराम यांचा अपमान करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. ‘अन्नपूर्णी’ हा चित्रपट हिंदूंविरोधी असून त्यात काही वादग्रस्त दृश्येही असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यापैकी एका सीनमध्ये श्रीराम हे मांसाहारी होते असं म्हटलं गेलंय. इतकंच नव्हे तर या चित्रपटातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सोलंकी यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्माते आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स इंडिया’विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रमेश सोलंकी यांनी एक्सवर याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटातील डायलॉग्स आणि सीन्सवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. ‘संपूर्ण जग हे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करत असताना काही लोकांनी हिंदूविरोधी चित्रपट ‘अन्नपूर्णी’ला प्रदर्शित केलं आहे. यामध्ये अभिनेता फरहानने अभिनेत्रीला असं म्हणून मांसाहार खाण्यास प्रवृत्त केलंय की प्रभू श्रीरामसुद्धा मांसाहारी होते. एकीकडे चित्रपटात नायिकेचे पुजारी पिता हे भगवान विष्णूसाठी नैवेद्य बनवत असतात, तर दुसरीकडे त्यांची मुलगी मांसाचं जेवण बनवत असते, इफ्तार करते आणि नमाज पठण करते. या चित्रपटाद्वारे जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, निर्माते जतिन सेठी, आर. रवींद्रन आणि पुनीत गोयंका, नेटफ्लिक्स इंडियाच्या प्रमुख मोनिका के आणि झी स्टुडिओचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी करतो’, असं त्यांनी लिहिलं आहे.