मुंबई: मालाडमधल्या जनकल्याण नगरमधील एका 21 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी भीषण आग लागली. या मजल्यावर राहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेनं आगीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बाल्कनीतून खाली उडी मारली. संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भयंकर घटनेचा साक्षीदार अभिनेता राकेश पॉल बनला. राकेशने आगीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सकाळी 10.50 च्या सुमारास राकेश शूटिंगनिमित्त घरातून निघत होता. त्याच वेळी अचानक त्याच्या इमारतीत आग लागली. या घटनेविषयी बोलताना तो म्हणाला, “मी शूटिंगसाठी निघतच होतो, तेव्हा मालाडमधल्या आमच्या इमारतीत फायर अलार्म वाजू लागला. त्याचवेळी तिसऱ्या मजल्यावरून आगीच्या ज्वाळा येत होत्या. सर्वांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती, त्यात राहणारी महिला आत अडकली होती.”
“आपला जीव वाचवण्यासाठी ती महिला बाल्कनीमध्ये आली. तिला वाचवण्यासाठी काही सेकंदं थांबण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र वाढती आग पाहून घाबरलेल्या महिलेनं बाल्कनीतून उडी मारली. हे सर्व इतकं अचानक घडलं की आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो. सुदैवाने इमारतीत पुरेशी सुविधा असल्याने आगीवर वेळेवर नियंत्रण मिळवता आलं”, असं तो पुढे म्हणाला.
प्रत्येक इमारतीत अशा प्रकारची सुविधा असणं अत्यंत गरजेचं असल्याचं राकेशने यावेळी सांगितलं. इमारतीत आग लागताच रहिवाशांमध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांना काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.