इमरान खान यांच्यावरील हल्ल्याचा सेलिब्रिटींकडून निषेध; म्हणाले ‘3-4 गोळ्या लागूनही जर..’

| Updated on: Nov 03, 2022 | 8:12 PM

अली जफर ते बाबर आझम.. पहा कोणी काय म्हटलंय?

इमरान खान यांच्यावरील हल्ल्याचा सेलिब्रिटींकडून निषेध; म्हणाले 3-4 गोळ्या लागूनही जर..
Pakistan Former PM Imran khan
Follow us on

लाहौर: पाकिस्तानात एका मोठ्या रॅलीदरम्यान माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबाराच इमरान खान जखमी झाल्याची माहिती आहे. वजिराबाद याठिकाणी रॅली सुरू असताना हल्लेखोराने गोळीबार केला. हा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेनंतर इमरान खान यांना ताबडतोब लाहौरला नेण्यात आलं. सोशल मीडियावर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अली जफर, माया अली, सना जावेद, दाना नीर, अदनान सिद्दिकी यांसारख्या सेलिब्रिटींनी पोस्ट लिहित इमरान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

‘बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतरचे काळोखाचे, निराशाजनक दिवस मला आठवतात. देव न करो जर इमरान खान यांच्याही बाबतीत काही जीवघेणं घडलं तर काय उद्रेक होईल याची कोणीही कल्पना करू शकत नाही. पायात तीन-चार वेळा गोळी लागूनही जर त्यांचा उत्साह असा असेल तर आपल्याला आपल्या विचारांच्या पलीकडचा विचार करणं आवश्यक आहे’, असं ट्विट अभिनेता, गायक अली जफरने केलं.

हे सुद्धा वाचा

‘या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. अल्लाह कप्तानला सुरक्षित ठेवो आणि आमच्या प्रिय पाकिस्तानचे रक्षण करो,’ असं ट्विट बाबर आझमने केलं.

‘अजून किती खालच्या पातळीला तुम्ही उतरू शकता? इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. अल्लाहखातर या सर्व गोष्टींना पूर्णविराम द्या. माझ्या कॅप्टनसाठी आणि या हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना करतेय’, अशी पोस्ट माया अलीने लिहिली.

इमरान खान यांनी पाकिस्तानमध्ये ‘आझादी मोर्चा’ काढला होता. सरकारविरोधी लढ्यात ते रस्त्यावर उतरले होते आणि निदर्शनं करत होते. याच अंतर्गत गुरुवारी वजिराबाद याठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यात स्वत: इमरान खान सहभागी झाले होते.