बाॅलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी रविवारची सकाळ हैराण करणारी ठरलीये. सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे गोळीबार करण्यात आलाय. सुरूवातीला सांगितले गेले की, हा गोळीबार हवेत करण्यात आला. मात्र, आता हे स्पष्ट झाले की, हा गोळीबार हवेत नसून गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीच्या आसपास करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा आपल्या कुटुंबासोबत घरात होता. आता या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आलाय.
दोन दिवसांपूर्वीच सलमान खान याला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी ही केली होती. विशेष म्हणजे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीत येत सलमान खान हा देखील चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसला. यावेळी सलमान खान याच्यासोबत गॅलरीत त्याचे वडील देखील दिसत होते. सलमान खानला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
ज्या गॅलरीत सलमान खान उभा राहून चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसला, त्याच गॅलरीच्या आसपास आता गोळीबार करण्यात आलाय. हेच नाही तर एक गोळी बरोबरच गॅलरीच्या तिथेच लागलीये. यामुळे आता चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण हे बघायला मिळतंय. रिपोर्टनुसार हल्लेखोरांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या आहेत.
हेच नाही तर सलमानच्या गॅलरीच्या जाळीतून एक गोळी घराच्या हातमध्ये गेल्याचा देखील दावा हा केला जातोय. पोलिस आणि तपास यंत्रणेकडून या प्रकरणातील तपास हा केला जातोय. हेच नाही तर या प्रकरणातील एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील पुढे आलाय. या व्हिडीओमध्ये हल्लेखोर हे दिसत असून हे हल्लेखोर दुचाकीवर आल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हा गोळीबार झाल्याने नक्कीच भीतीचे वातावरण हे बघायला मिळत आहे. आता पोलिसांची 20 पथके या प्रकरणात तपास करत आहेत. अजूनही काही मोठे खुलासे या प्रकरणात होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये चिंता बघायला मिळत आहे.