अभिनेता सलमान खान गेल्या दोन दशकांपासून मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतोय. वांद्रे पश्चिम भागातील बँडस्टँड परिसरात हे अपार्टमेंट आहे. हे मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असून तिथे सतत असंख्य लोक फिरायला येत असतात. तरीसुद्धा सलमानचं हे घर फारसं आलिशान नाही. 2009 मध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या चॅट शोमध्ये सलमानने त्याच साध्या घरात राहण्यामागचं कारण सांगितलं होतं. आता रविवारी पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर त्याचं ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
सलमानचं ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मध्येच राहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याचे आईवडील. विशेषत: आई सलमा खान यांच्या जवळ राहता यावं म्हणून सलमान गेल्या वीस वर्षांपासून तिथेच राहत आहे. चॅट शोमध्ये फराह म्हणाली, “तू वर्ल्ड सुपरस्टार आहेस आणि कोट्यवधींमध्ये तुझी कमाई आहे. पण तरीही तू वन बीएचकेमध्ये राहतोस. कारण तुझ्या घराखालीच आईचं घर आहे.” त्यावर बोलताना सलमान म्हणाला, “होय, खरंतर हे तीन बेडरुम हॉल आहे पण नंतर ते वन बीएचके कसं झालं हे मलाच माहीत नाही. पण आईवडिलांच्या जवळ राहण्याचं सुख वेगळंच आहे.”
सलमान खानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे गोळीबार झाला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. याप्रकरणी वांद्रे पोलीस तसंच स्थानिक पोलीस गुन्हे शाखा समांतर तपास करत आहेत. गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल याने फेसबुक पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा तपास पोलीस करत आहेत. त्याची माहिती मिळाली की दिली जाईल. मात्र या घटनेवरून कायदा-सुव्यवस्था बिघडली असा अर्थ काढणं चुकीचं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानला फोन करून सरकारकडून पूर्ण सहकार्य आणि मुंबई पोलीस विभागाकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षेचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चा करून सलमानची सुरक्षा वाढवण्याची सूचना केली.