सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झालेला आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता. सांगायचं झालं तर याआधी देखील अनेकदा अभिनेत्याला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सलमान खान याच्या चाहत्यांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर येत आहे…
अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत मोठी कबुली दिली होती. सलमान खान याची हत्या का करणार होता? याचं कारण लॉरेन्स बिश्नोई याने सांगितलं होतं. त्यामुळे सलमान खान याच्या घराबाहेर झालेला गोळीबार लॉरेन्स बिश्नोई यानेच घडवून आणला आहे का? अशी देखील चर्चा सध्या जोर धरत आहे.
सलमान खान का आहे लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर?
एनआयएच्या चौकशीत लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं की, सलमानला त्याच्या हिटलिस्टमध्ये टॉपवर ठेवलं आहे. त्याचं कारणही त्याने सांगितले. 1998 मध्ये सलमान खान यानं काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे तो सलमान खानवर नाराज होता. बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू बनला आहे.
सलमान खान आलेला धमकीचा मेल
सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या दबंग खान याच्याकडे व्हाय प्लस सुरक्षा आहे… गेल्या वर्षी सलमान खान याच्या ऑफिसमध्ये धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. सलमानच्या जवळच्या प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता. या ईमेल प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्यावर तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.