मुंबई : सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट आज (21 एप्रिल) प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमानच्या या चित्रपटांची कलाकारांची मोठी फौजच आहे. मात्र हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहावा की पाहू नये, याची पाच कारणं जाणून घेऊयात..
सलमान खानचा हा चित्रपट एक परफेक्ट फॅमिली एंटरटेनर आहे. या चित्रपटाच्या कथेत प्रेक्षकांना तो भाई दिसतो, जो कठीण काळ आल्यावर आपल्या कुटुंबासाठी सुपरमॅन बनतो आणि एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे तो चुकासुद्धा करतो. ही परफेक्ट हिरोची कथा नाही, पण एका भाईची कहाणी आहे.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटात कॉमेडीचा भरणा आहे. सतीश कौशिक आणि आसिफ शेख यांची कॉमेडी असो किंवा भाईजानचे तीन भाऊ आणि पूजा हेगडेची कॉमेडी टायमिंग असो.. यातील विनोदाचा तडका चित्रपटाला आणखी मजेशीर बनवतो.
कॉमेडी आणि फॅमिली एंटरटेनरसोबत हा एक धमाकेदार ॲक्शन चित्रपटसुद्धा आहे. कधी मेट्रोमधील फाइट तर कधी साऊथच्या अंदाजातील ॲक्शन सीक्वेन्स.. प्रत्येक सीन वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आला आहे. यामुळे यातील ॲक्शन सीन्स अधिक रंजक वाटतात.
सलमान खानच्या चाहत्यांना अशा प्रकारच्या चित्रपटाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. या चित्रपटात प्रेक्षकांनी सलमानचे तीन वेगवेगळे लूक्स पहायला मिळणार आहेत. क्लायमॅक्समधील सलमानचे सिक्स पॅक्स त्याच्या चाहत्यांसाठी ईदीपेक्षा कमी नसेल.
या चित्रपटातील साऊथचा तडका कथेला आणखी रंजक बनवतो. व्यंकटेश डग्गुबती, भूमिका चावला आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या भूमिकांनी कथेत नवा स्वाद आणला आहे.
काही प्रेक्षकांनी या चित्रपटातील फाइट सीक्वेन्स हे गरजेपेक्षा जास्त हिंसक वाटू शकतात. ज्यांना मोठ्या पडद्यावर असे सीन्स पाहणं आवडत नाहीत, त्यांना कदाचित हे सीन्स खटकू शकतात.
तुम्ही जर शहनाज गिलसाठी हा चित्रपट पाहायला जात असाल तर त्यापेक्षा बिग बॉसचेच तिचे एपिसोड्स पुन्हा पाहिलेले बरे, असं वाटू शकतं.
या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अशा काही गोष्टी दाखवल्या आहेत, ज्याचा अंदाज प्रेक्षकांना आधीच लागू शकतो. तुम्हाला दमदार क्लायमॅक्स पहायचा असेल तर तुम्ही निराश होऊ शकता.
विजेंदर सिंह कमालीचा बॉक्सर आहे. परंतु तो तितकाच वाईट अभिनेता आहे, हे चित्रपट पाहून कळतं. त्याच्यामुळे या चित्रपटातील खलनायक कमकुवत वाटू लागतो.
या चित्रपटात असे बरेच सीन्स आहेत, ज्यांचा लॉजिकशी काहीचं संबंध नाही.