मुंबई: प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन हा बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा विजेता ठरला. स्टॅनच्या विजेतेपदावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कारण ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसचा प्रेक्षक दोन गटांमध्ये विभागला गेला होता. शिव ठाकरे हा या सिझनचा विजेता ठरेल असं एका गटाला वाटत होतं. तर दुसऱ्या गटाचा मोठा पाठिंबा प्रियांका चहर चौधरीला होता. या दोघांपैकी कोणीतरी एक विजेता ठरेल, असे अंदाज वर्तवले जात होते. आता बिग बॉस 16 चे माजी स्पर्धक गौतम विज आणि अंकित गुप्ता यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे एमसी स्टॅनवर निशाणा साधला आहे.
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये गौतम आणि अंकितने त्यांच्या आगामी ‘जुनूनियत’ या म्युझिकल सीरिजचं प्रमोशन केलं. या प्रमोशननंतर दिलेल्या एका मुलाखतीत गौतमने बिग बॉसच्या विजेतेपदावर आश्चर्य व्यक्त केलं. “हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का होता. कारण प्रियांका विजेती ठरेल अशी आम्ही अपेक्षा करत होतो. ती दररोज सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंडमध्ये होती”, असं गौतम म्हणाला.
विजेता एमसी स्टॅनवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत गौतम पुढे म्हणाला, “प्रियांकानंतर शिव तरी विजेता ठरेल अशी माझी अपेक्षा होती. एमसी जिंकलाय.. चांगली गोष्ट आहे की तो जिंकला आहे. उशिरा गेम समजला पण चांगली बाब आहे की समजलं. तर माझ्या मते पुढच्या वेळी ही लोकांची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की उशिरा गेम समजून घ्या आणि ट्रॉफी घेऊन जा.” हे ऐकताच त्याच्या बाजूला उभा असलेला अंकित मिश्किलपणे हसतो.
प्रियांकाचा खास मित्र आणि सहअभिनेता अंकित गुप्तानेही बिग बॉसच्या विजेतेपदावर प्रतिक्रिया दिली. प्रियांकाची बाजू घेत तो म्हणाला, “मी बिग बॉसमध्ये जिंकण्यासाठी भाग घेतलाच नव्हता. मला तिला जिंकताना पहायचं होतं. अगदी पहिल्या दिवसापासून ती चांगला खेळ खेळत होती. खऱ्या गोष्टींसाठी ती भांडली, समस्यांविरोधात तिने आवाज उठवला आणि मैत्रीत प्रामाणिकता जपली.” प्रियांका आणि शिव यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तेच त्यांचं यश आहे, असं म्हणत गौतमने दोघांचं कौतुक केलं.
प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भनोट, अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या पाच जणांमध्ये चुरस रंगली होती. त्यात रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारली. त्याला बिग बॉस 16 ची ट्रॉफी आणि 31 लाख 80 हजार रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली.