बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन संपल्यानंतर लगेचच हिंदी बिग बॉसचा अठरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये 18 स्पर्धक सहभागी झाले आहेत. जगभरातून विविध स्पर्धक या शोमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्यावर 200 पेक्षा अधिक कॅमेऱ्यांची नजर असते. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी प्रत्येक स्पर्धकाला बरीच तयारी करावी लागते. यापैकी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत काय-काय सामान घेऊन जायचं? अठराच्या अठरा स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात सामानाने भरलेला सुटकेस आणला आहे. यापैकी काही कलाकारांना सुटकेसमध्ये काय काय आणलंय असा प्रश्न विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तरं दिली.
हेमा शर्माने सांगितलं की बिग बॉसच्या घरात वेस्टर्न कपडे घालणारे तुम्हाला बरेच स्पर्धक दिसतील. पण मी फक्त साड्याच नेसणार आहे. व्हायरल भाभीने असं उत्तर दिलं असलं तरी बिग बॉसच्या घरात जाताच तिने दुसऱ्या स्पर्धकाचा नाईट गाऊन परिधान केला होता.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं की ते 50 चश्मे घेऊन बिग बॉसच्या घरात जात आहेत. हे चश्मे त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी त्यांच्यासाठी पाठवले आहेत.
तेजिंदर बग्गा यांचं असं म्हणणं आहे की ते राजकारणी आहेत, म्हणूनच ते फक्त दोन जोड्या म्हणजेच चार कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात जात आहेत. सलमान खानसमोरही ते हेच म्हणाले की ते चार कपडे घेऊन शोमध्ये आले आहेत आणि सलमानची इच्छा असेल तर तो त्याच्या ब्रँडचे कपडेही देऊ शकतो.
बिग बॉसच्या घरात नायरा बॅनर्जीने तब्बल 300 ते 400 कपडे घेऊन एण्ट्री केली आहे. यात कॅज्युअल, नाइट सूट आणि इतरही कपड्यांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर ‘वीकेंड का वार’ एपिसोडसाठी तिला खास बाहेरून कपडे येणार आहेत.
तमिळ अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रुतिका अर्जुन राजनेही तिच्यासोबत प्रत्येक फॅशनचे कपडे आणले आहेत. मी बिग बॉसच्या घरात इंडियन आणि वेस्टर्न असे दोन्ही प्रकारचे कपडे परिधान करेन, असं ती म्हणाली.
करणवीर मेहराने सांगितलं की तो बाहेर जसा आहे, तसाच या शोमध्ये वावरेल. त्यामुळे ‘वीकेंड का वार’ सोडून बाकी दिवशी तो सर्वसामान्य कपड्यांमध्येच दिसून येईल.