लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मतदारांनी आपला लोकप्रतिनिधी म्हणून अनेक नव्या आणि जुन्या सेलिब्रिटींना संसदेत पाठवले आहे. प्रथमच खासदार कंगना राणौत आणि अरुण गोविल हे लोकसभेत जाणार आहेत. हेमा मालिनी ते मनोज तिवारी यांचा देखील यात समावेश आहे. देशातील 543 लोकसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चित्रपट जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती रिंगणात होत्या.
अभिनेत्री कंगना राणौत हिने मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. तिने सहा वेळा राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केलाय. ‘रामायण या मालिकेतील रामाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अरुण गोविल यांना देखील भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांनी देखील मेरठमधून सपाच्या सुनीता वर्मा यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या सलग तिसऱ्यांदा मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे मुकेश धनगर यांचा पराभव केलाय. याशिवाय भोजपुरी अभिनेता आणि गायक मनोज तिवारीने ईशान्य दिल्लीतून काँग्रेसच्या कन्हैया कुमारचा पराभव केलाय.
प्रसिद्ध भोजपुरी कलाकार रवी किशन यांनीही गोरखपूरमधून सपाच्या काजल निषाद यांचा पराभव करून दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश केला आहे. केरळमधून अभिनयातून राजकारणात आलेले भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांनी प्रथमच त्रिशूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय. त्यांनी भाजपचे एसएस अहलुवालिया यांचा पराभव केलाय. याशिवाय चित्रपट कलाकार जून मल्ल्या, सयानी घोष, शताब्दी राय, रचना बॅनर्जी आणि देव अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर बंगालमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
याआधी नर्गिस, सुनील दत्त, राजेश खन्ना, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, सनी देओल आणि मुनमुन सेन यांसारख्या सिनेविश्वातील चेहऱ्यांनीही एकेकाळी राजकारणात प्रवेश केला आहे.