मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्येही फार उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘गदर 2’ची जोरदार ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा होत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये भारतातील तरुण आणि पाकिस्तानची तरुणी यांच्यातील प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती. आता त्याचीच पुढील कथा सीक्वेलमध्ये मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ति दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या लव्हस्टोरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
भारत-पाकिस्तानमधील सीमापार प्रेमकथेबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सनी देओल म्हणाला, “लोकांनी दुसऱ्यांना जगू दिलं पाहिजे. हे त्यांचं खासगी प्रकरण आहे. आजकाल तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की एखाद्या ॲपद्वारे लोक एकमेकांना भेटतात. त्यामुळे साहजिकच जेव्हा ते एकमेकांवर प्रेम करू लागतात, तेव्हा त्यांना दूर राहायचं नसतं. एकमेकांसोबत आयुष्य घालवू इच्छितात. या सर्व गोष्टी होत राहतील. ही एक जगण्याची पद्धतच आहे. त्याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यायची गरज नाही. त्यावर टीका करू नये कारण हे त्यांचं खासगी आयुष्य आहे. त्यांना जगू द्या. योग्य काय आणि चुकीचं काय हे त्यांना माहीत आहे.”
‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीसुद्धा सीमा हैदरच्या प्रेमकथेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही चांगली गोष्ट आहे. प्रवास सुरूच असला पाहिजे. मग ते इथून एकाने तिथं जाणं असो किंवा तिथून एखाद्याने इथे येणं असो. माझ्या मते बॉर्डर संपलं पाहिजे. सर्वकाही भारत बनलं पाहिजे, एक देश बनला पाहिजे. जेणेकरून या सर्व समस्याच नष्ट होतील. कोट्यवधी रुपये यात वाया जात आहेत. त्यामुळे माझ्या चित्रपटातही त्यावरून एक डायलॉग आहे. प्रेमाला कोणतीच सीमा नसते. प्रेम हे या भौतिक सीमेच्याही पार आहे.”
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं नाव सध्या देशभरात चांगलंच चर्चेत आहे. सचिनच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सीमाविषयी बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. किंबहुना याप्रकरणाचा तपाससुद्धा सुरू झाला आहे. सीमा हैदर हिचं वय 19 वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. सीमा ही पाकिस्तानची नागरिक असून तिला चार मुलं आहेत. पब्जी गेम खेळताना तिला सचिन मीणासोबत प्रेम झालं आणि त्यांनी नेपाळमध्ये लग्न केलं. पण सीमा अनधिकृतपणे भारतात आल्याने मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.