मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला आहे. मात्र अजूनही थिएटरमध्ये कमाई सुरूच आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. तारा आणि सकीनाची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. केवळ मुंबईतच नाही, तर देशातील विविध राज्यांमध्ये या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ने कोणत्या राज्यात आणि शहरात बंपर कमाई केली, ते पाहुयात..
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागाप्रमाणेच सीक्वेलवरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. दिल्ली असो किंवा मुंबई.. प्रत्येक राज्याच्या प्रेक्षकांना तारा सिंगची भूमिका आवडली. सुरुवातीला धमाकेदार कमाईनंतर शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित होताच ‘गदर 2’च्या कमाईचा वेग थोडा मंदावला. मात्र प्रदर्शनाच्या 40 व्या दिवशीही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे.
मुंबई- 143.30 कोटी रुपये
दिल्ली-युपी- 125.29 कोटी रुपये
पूर्व पंजाब- 64.40 कोटी रुपये
सीपी- 27 कोटी रुपये
सीआय- 16.98 कोटी रुपये
राजस्थान- 27.07 कोटी रुपये
मैसूर- 21.26 कोटी रुपये
पश्चिम बंगाल- 19.27 कोटी रुपये
बिहार-झारखंड- 21.82 कोटी रुपये
आसाम- 10.63 कोटी रुपये
ओडिसा- 8.80 कोटी रुपये
तमिळनाडू आणि केरळ- 2.93 कोटी रुपये
‘गदर 2’ने प्रदर्शनाच्या चाळिसाव्या दिवसी 45 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत कमाईचा एकूण आकडा हा 520.80 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र अद्याप शाहरुख खानच्या ‘पठाण’चा विक्रम मोडण्यात ‘गदर 2’ला यश मिळालं नाही. पठाणने 543.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. ‘गदर 2’ या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘गदर 2’चा ओटीटी प्रीमिअर येत्या 6 ऑक्टोबर रोजी झी 5 वर होणार आहे. एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या चार आठवड्यांनंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जातो. मात्र ‘गदर 2’ हा चित्रपट चार आठवड्यांपेक्षा बराच काळ थिएटरमध्ये होता, म्हणून ओटीटीवर उशीरा प्रदर्शित केला जात आहे.