अभिनेत्री अमीषा पटेल तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी अमीषाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती बिझनेसमन निर्वाण बिर्लाच्या मिठीत दिसली होती. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्याही डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अमीषाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आता निर्वाणने त्यावर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अमीषासोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत निर्वाणने स्पष्ट केलं की तो अमीषा पटेलला डेट करत नाहीये. “अमीषा ही माझी फॅमिली फ्रेंड आहे. माझ्या वडिलांना ती खूप आधीपासून ओळखते. आमच्या व्हायरल फोटोबद्दल बोलायचं झाल्यास, आम्ही एका म्युझिक अल्बमसाठी दुबईत शूटिंग करत होतो. त्या म्युझिक अल्बममध्ये अमीषाने काम केलंय. तेव्हाचा तो फोटो आहे,” असं तो म्हणाला. निर्वाण बिर्ला हा बिझनेसमन यशवर्धन बिर्ला यांचा मुलगा आहे. तो ओपन माइंड्स एज्युकेशन प्राइव्हेट लिमिटेडचा संस्थापक आहे. निर्वाण 31 वर्षांचा असून अमीषा 49 वर्षांची आहे.
अमीषाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिचं नाव विवाहित दिग्दर्शक विक्रम भट्टशी जोडलं गेलं होतं. अमीषा आणि विक्रम हे जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. एका मुलाखतीत अमीषासोबतच्या नात्याविषयी विक्रम भट्ट म्हणाले, “अमीषा आणि मी एकत्र वाईट काळ पाहिला. मात्र जेव्हा आमचा चांगला काळ सुरू झाला, तेव्हा दुर्दैवाने आम्ही सोबत नव्हतो. माझे एकानंतर एक चित्रपट फ्लॉप होत होते. तीसुद्धा खूप संघर्ष करत होती. अखेर 1920 या माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आमचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर माझे शापित आणि हाँटेडसारखे चित्रपट प्रदर्शित झाले.”
अभिनेत्री सुष्मिता सेनशी ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्टने अमीषाला डेट करण्यास सुरुवात केली होती. 2006 मध्ये ‘आँखे’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रमच्या 1920 या चित्रपटानंतर दोघांचं ब्रेकअप झालं.