मुंबई : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठने इस्लाम धर्म स्वीकारत बॉयफ्रेंड फैजान अन्सारीशी निकाह केला. वंदना तिवारी ऊर्फ गेहनाच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गहनाने मुस्लीम विवाहपद्धतीनुसार इस्लाम धर्म स्वीकारत निकाह केला. ‘गंदी बात’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली गहना ही चंदीगडमधील पंडित कुटुंबातील आहे. त्यामुळे फैजानशी निकाह करण्याच्या आणि धर्मांतर करण्याच्या तिच्या निर्णयामुळे चाहते नाराज झाले आहेत. काहींनी लव्ह-जिहादचाही आरोप केला आहे. मात्र गहना आणि फैजानच्या जवळच्या व्यक्तीने हा दावा फेटाळला आहे. या दोघांचं नातं खरं प्रेम आणि एकमेकांविषयी आदर यावर आधारित असल्याचं म्हटलं गेलंय.
फैजान हा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बॉलिवूड अभिनेता आहे. नुकताच तो ॲमेझॉन मिनी टीव्हीवरील ‘डेटबाजी’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. गहना आणि फैजानच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या फोटोंमध्ये गहनाने लाल रंगाचा लेहंगा तर फैजानने काळ्या रंगाचा पठाणी सूट परिधान केला आहे.
याआधी गहना अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासोबतच्या एका वादामुळे चर्चेत आली होती. गहना आणि राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांच्या निर्मितीशी संबंधित प्रकरणामुळे मुंबई पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांनंतर या दोघांची जामिनावर सुटका झाली. “माझं नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं आहे. कोणत्याच पीडितेनं माझं नाव घेतलं नव्हतं. याचा अर्थ असाच होतो की मी या सर्व प्रकरणामध्ये कुठेच सहभागी नाही. राज कुंद्राच्या मोबाईल अॅपसाठी काही बोल्ड व्हिडीओज शूट केले हे मी मान्य करते. पण तो अडल्ट कंटेट नव्हता. याशिवाय त्यांना जेव्हा आर्टिस्टची गरज असते तेव्हा ते सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती देतात. त्यामध्ये किती मानधन देणार त्याबाबतही माहिती दिलेली असते”, अशी प्रतिक्रिया गहना वशिष्ठने दिली होती.