मुंबई: ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला. फ्लोराने ‘मी टू’ मोहीमेदरम्यान खुलासा केला होता की तिच्या लिव्ह-इन पार्टनरने कशा पद्धतीने तिचं लैंगिक शोषण केलं होतं. त्याने माझा जीव घेण्याचाही प्रयत्न केला, असंही ती म्हणाली होती. याप्रकरणी आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फ्लोराने धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. फ्लोरा एका चित्रपट निर्मात्याला डेट करत होती.
बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी फ्लोराने तिचं घर सोडलं होतं. तू माझ्यावर किती प्रेम करतेस ते सिद्ध करून दाखव, असं तिच्या बॉयफ्रेंडने म्हटलं होतं. “तो सुरुवातीला इतका चांगला वागायचा, की माझ्या आई-वडिलांनाही त्याचा खरा चेहरा दिसला नाही. मात्र सोबत राहिल्यानंतर आठवड्याभरातच त्याचं खरं रुप समोर आलं”, असं तिने सांगितलं.
फ्लोराचा बॉयफ्रेंड सतत तिला मारहाण करायचा. तिचा मोबाइल फोनसुद्धा त्याने स्वत:कडेच ठेवला होता. इतकंच नव्हे तर याबद्दल कोणाला काही सांगितलं तर आई-वडिलांचा जीव घेईन अशी धमकीही त्याने फ्लोराला दिली होती.
घडलेल्या घटनेबद्दल सांगताना फ्लोरा पुढे म्हणाली, “त्या रात्री त्याने मला इतकं मारलं की माझा जबडा तुटला. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा कुठल्याही परिस्थितीचा सामना करावा लागला तर कोणताही विचार न करता थेट पळून ये, असं माझ्या आईने एकदा सांगितलं होतं. तेच मला आठवलं आणि मी तिथून घरी पळून आले.”
फ्लोराने तिच्या बॉयफ्रेंडविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार लिहून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही तिने केला. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर लेखी तक्रार पोलिसांकडे दिल्याचं तिने सांगितलं.