Gashmeer Mahajani | ‘माझ्या पूर्वजांनी केलेली चूक..’; गश्मीरने दिली वडिलांच्या निधनाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं

| Updated on: Jul 31, 2023 | 8:27 AM

मुलगा गश्मीर महाजनी त्यांच्यासोबत का नव्हता, ते एकटेच का राहत होते आणि वडिलांशी त्याचा संपर्क का नव्हता, असे बरेच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले. यावर योग्य वेळी व्यक्त होणार असल्याचं गश्मीरने एका पोस्टद्वारे स्पष्ट केलं होतं.

Gashmeer Mahajani | माझ्या पूर्वजांनी केलेली चूक..; गश्मीरने दिली वडिलांच्या निधनाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं
Ravindra and Gashmeer Mahajani
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 31 जुलै 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. तळेगाव इथल्या सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले होते. रवींद्र महाजनी हे गेल्या आठ महिन्यांपासून त्या सदनिकेत भाड्याने एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुलगा गश्मीर महाजनी त्यांच्यासोबत का नव्हता, ते एकटेच का राहत होते आणि वडिलांशी त्याचा संपर्क का नव्हता, असे बरेच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले. यावर योग्य वेळी व्यक्त होणार असल्याचं गश्मीरने एका पोस्टद्वारे स्पष्ट केलं होतं. आता इन्स्टाग्रामवर गश्मीरने नेटकऱ्यांशी संवाद साधला आहे. ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनअंतर्गत त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली आहेत.

चाहत्यांच्या प्रश्नांना गश्मीरने दिलेली उत्तरं-

  • तू सध्या कसा आहेस?
    – आई हळूहळू बरी होत आहे, आम्ही यातून बाहेर येवू.
  • तू शूटिंगला सुरुवात केलीस का?
    – नाही, पण माझ्या आईची तब्येत पूर्णपणे बरी झाल्यानंतर लवकरच सुरुवात करेन.
  • राग आला तर त्यावर नियंत्रण कसं मिळवतोस?
    – मी फक्त माझ्या कुटुंबीयांकडे आणि जे लोक मला ओळखतात, माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे पाहतो. बाकी सर्व फक्त गोंगाट असतो, हे मी नेहमीच म्हणत आलो आहे.
  • सर्व नकारात्मकतेतून तू घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. आम्ही तुला पुन्हा कधी पडद्यावर पाहू शकू?
    – लवकरच. मी आणि इंडस्ट्रीतील माझे मित्र संयमाने त्याची वाट पाहत आहेत. आम्ही लवकरच आमच्या पायावर पुन्हा उभे राहू कारण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी ते फार महत्त्वाचं आहे.
  • हे सर्व घडत असताना तुझी सर्वांत मोठी साथ कोणी दिली?
    – माझे मित्र अक्षय आणि श्रीकार. प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी हेसुद्धा कुटुंबाप्रमाणे खंबीरपणे सोबत उभे राहिले.
  • या कठीण दिवसांत मराठी फिल्म इंडस्ट्रीने तुझी साथ दिली का?
    – होय, काही ठराविक समजुतदार लोकांनी मला फोन केला आणि साथ दिली. खासकरून प्रवीण तरडे, रितेश देशमुख, मृण्मयी देशपांडे. हे सर्व जण खूप खास आहेत आणि त्यांची मदत मी कधीच विसरणार नाही.
  • तुझ्या वडिलांसाठी काही शब्द?
    – ते शब्द मी तेराव्याच्या कार्यादरम्यान म्हटले आहेत. त्याविषयी तुम्ही जाणून घेण्यात काही अर्थ नाही.
  • तुझी उत्तरं मी वाचली, तुझ्यावरील प्रेम आणखी वाढलं आणि तुझा अभिमान वाटतो.
    – काहीही झालं तरी मी पुन्हा नवीन सुरुवात लवकरच करेन. मला माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे. माझ्या पूर्वजांनी केलेली चूक मी करणार नाही.
  • सर्वांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही चुकीचे नाही आहात. ज्यांचा विश्वास नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
    – धन्यवाद, पण आम्ही तसंही त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण आमच्या आईने आम्हाला शिकवलं आहे की ते सतत बोलणार आणि सतत आडवे जाणार.

मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला होता. ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी यांचे ते पुत्र होते. मुंबईतील खालसा महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना रॉबिन भट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर यांच्यामुळे महाजनी यांच्या अभिनयातील आवडीला खतपाणी मिळालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं. रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि रवींद्र महाजनी चांगलेच प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या, ज्या चांगल्याच गाजल्याही. 1975 ते 1990 पर्यंतचा कालखंड त्यांनी गाजवला.

हे सुद्धा वाचा