बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यादरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपापसांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, असं म्हणत प्राजक्ताने धस यांनी आपली जाहीर मागावी, अशी मागणी केली. यानंतर मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दर्शविला. अशातच तिच्या ‘फुलवंती’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता गश्मीर महाजनी यानेसुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली. अशातच एका युजरने गश्मीरला प्राजक्ताविषयी प्रश्न विचारला. “प्राजक्ताच्या बाजूने काही बोलशील का?”, असं त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावर गश्मीरने लिहिलं, ‘मला संपूर्ण प्रकरण माहीत नाही कारण मी चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला इतकंच माहीत आहे की प्राजक्ता ही सक्षम, स्वतंत्र आणि स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे… आणि त्यासाठी मी तिचा खूप आदर करतो.’ गश्मीर आणि प्राजक्ताने ‘फुलवंती’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यामध्ये त्याने शास्त्री बुवाची भूमिका साकारली होती, तर प्राजक्ता या चित्रपटाची निर्माती होती. गश्मीरशिवाय सचिन गोस्वामी, सुशांत शेलार, कुशल बद्रिके, पृथ्वीक प्रताप, विशाखा सुभेदार यांसारख्या कलाकारांनीही प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे.
शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता म्हणाली होती, “सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण मी शांत होते म्हणजे या सगळ्याला माझी मूकसंमती नाहीये. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढावलं आहे. तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता? असा संतप्त सवाल प्राजक्ताने विचारला. ती म्हणाली ” अतिशय कुत्सितपणे त्यांनी ही टिप्पणी केली. परळीला पुरूष कलाकार गेले नाहीत का? एका फोटोच्या आधारे तुम्ही कोणासोबतही नाव जोडणार का? वैयक्तिक स्वार्थासाठी अभिनेत्रींची नावं घेतली जातात.”