‘राज्यात चाललेल्या विकारी राजकारणावर तुझं काय मत?’; नेटकऱ्याला गश्मीर महाजनीचं उत्तर

| Updated on: Sep 04, 2023 | 1:08 PM

अभिनेता गश्मीर महाजनीने नुकताच इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्याला महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

राज्यात चाललेल्या विकारी राजकारणावर तुझं काय मत?; नेटकऱ्याला गश्मीर महाजनीचं उत्तर
Gashmeer Mahajani
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करण्यास सज्ज झाला आहे. वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्याने कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र यादरम्यान तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात होता. इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी अनेकांनी गश्मीरला त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विविध प्रश्न विचारले. एका युजरने त्याला महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मत मांडण्यास सांगितलं.

‘महाराष्ट्राच्या राजकारणावर काय मत?’

‘सद्यस्थितीला महाराष्ट्रात चाललेल्या विकारी राजकारणावर तुमचं काय मत आहे? मान्य आहे हे तुमचं क्षेत्र नाही पण तरीही..’, असा सवाल संबंधित युजरने गश्मीरला केला. त्यावर उत्तर देताना गश्मीरने लिहिलं, ‘जे अजूनतरी माझं क्षेत्र नाही आणि ज्यातलं आता तरी मला सखोल ज्ञान नाही, त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.’ या सेशनदरम्यान एका नेटकऱ्याने गश्मीरला ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोबद्दल प्रश्न विचारला. ‘बिग बॉस 17 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार का’, असं एकाने विचारलं.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार का?’

बिग बॉसच्या प्रश्नाचं उत्तर देताना गश्मीरने लिहिलं, ‘त्यांच्या सिझनच्या क्रमांकाशी जुळवून घेण्यासाठी माझी 17 वेळा नकार देण्याची इच्छा आहे. पण आतापर्यंत मी फक्त तीन वेळाच बिग बॉसची ऑफर नाकारली आहे.’ यावेळी एका युजरने गश्मीरला मानधनाविषयीही प्रश्न विचारला. ‘टर्कीमधील प्रसिद्ध अभिनेत्याला एका एपिसोडसाठी 52 हजार युरो मानधन मिळतं. भारतात किती मिळतं?’, असा सवाल गश्मीरला विचारण्यात आला. त्यावर त्याने लिहिलं, ‘टर्कीश शोजचे हक्क विकत घेऊन आणि त्यांना आपलंसं करण्याइतकं मानधन आम्हाला मिळतं.’

वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीर त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 11 जुलै रोजी रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका खोलीत मृतावस्थेत आढळले होते. त्यांचं निधन कार्डिॲक अरेस्टने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.