मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. तळेगाव इथल्या एका सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी ही माहिती समोर आली होती. सिनेसृष्टीतील इतके मोठे अभिनेते आणि त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी इंडस्ट्रीत स्टार असून अखेरच्या दिवसांत रवींद्र महाजनी यांची अशी अवस्था का झाली, असे प्रश्न नेटकऱ्यांकडून, चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आले होते. ते कुटुंबीयांपासून दूर वेगळे आणि एकटेच का राहत होते, त्यांच्यासोबत गश्मीर का नव्हता, त्यांच्या निधनाबद्दल दोन दिवस कोणाला काहीच कसं कळलं नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं खुद्द गश्मीरने दिली आहेत. ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला.
याच मुलाखतीत त्याने रवींद्र महाजनी यांच्या निधनामागचं नेमकं कारणसुद्धा सांगितलं. रवींद्र महाजनी हे काही वर्षांपूर्वीच कुटुंबापासून वेगळे एकटे राहत होते. गश्मीर 14-15 वर्षांचा असतानाच ते घर सोडून निघून गेले होते. इतकंच नव्हे तर ठराविक काळानंतर त्यांनी कुटुंबीयांशीही कोणताच संपर्क ठेवला नव्हता. मात्र वडील कुठे राहतायत, याची माहिती वेळोवेळी गश्मीर आणि त्याचे कुटुंबीय ठेवत होते. तळेगाव इथल्या सदनिकेत ते एकटेच राहत होते आणि घरकामासाठीही त्यांना कोणाची मदत नको होती.
रवींद्र महाजनी यांचं निधन कार्डिॲक अरेस्टने झाल्याची माहिती डॉक्टरांनी गश्मीरला दिली होती. “डॉक्टर म्हणाले की ते तुमच्या समोर जरी असते तरी कार्डिॲक अरेस्टने त्याच क्षणी त्यांचं निधन झालं असतं. यातनाविरहित मरण प्रत्येकालाच हवं असतं. त्यांना जाताना कुठलीच यातना झाली नाही. ज्याप्रकारचं आयुष्य जे जगत होते, ते त्यांनीच निवडलं होतं. अशा प्रकारचं आयुष्य त्यांनी आता नव्हे तर 20 वर्षांपूर्वीच निवडलं होतं. त्यांच्यासोबत आमचं एकतर्फी नातं होतं. आम्हाला वाटायचं की त्यांनी आमच्यासोबत राहावं, पण त्यांना एकटं राहायचं होतं. त्यांना जेव्हा कुटुंबाची आठवण यायची, तेव्हा ते यायचे. माझी आई आयुष्यभर त्या एकाच माणसाची वाट पाहत राहिली. त्यामुळे शोकांतिका हा शब्द त्यांच्यासाठी वापरू नये. खरी शोकांतिका आता त्या रुममध्ये बसली आहे”, अशा शब्दांत गश्मीर व्यक्त झाला.
मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला होता. ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी यांचे ते पुत्र होते. मुंबईतील खालसा महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना रॉबिन भट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर यांच्यामुळे महाजनी यांच्या अभिनयातील आवडीला खतपाणी मिळालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं.