अभिनेत्री गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार हे रमजानच्या महिन्यात उमराह करण्यासाठी मक्काला गेले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा चिमुकला मुलगा झिहानसुद्धा होता. उमराह केल्यानंतर गौहर आणि झैदने पहिल्यांदाच त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवला. झिहानसोबतचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ‘आमच्या छोट्या राजकुमारकडून या जगाला सलाम’ असं कॅप्शन देत तिने झिहानसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत झिहानवर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करत राहा, अशी विनंती तिने चाहत्यांना केली. गौहरने पोस्ट केलेल्या या फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
झिहानच्या जन्माच्या 10 महिन्यांनंतर गौहर आणि झैदने त्याचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला आहे. या फोटोंवर एका युजरने लिहिलं ‘माशाल्लाह!’ तर ‘झिहान त्याच्या वडिलांसारखाच दिसतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. टीव्ही इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. माही विजने ‘प्रिन्स माशाल्लाह’ असं लिहिलंय. तर सोफी चौधरीने म्हटलंय, ‘त्याच्यावर नेहमीच अल्लाहचा आशीर्वाद असू दे.’
‘बिग बॉस 7’ची विजेती गौहर खानने 25 डिसेंबर 2020 रोजी संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर 2022 मध्ये गौहरने मुलाला जन्म दिला. गौहर आणि झैदची पहिली भेट मुंबईतील एका दुकानात झाली होती. त्यानंतर झैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. तेव्हापासून हे दोघं हळूहळू एकमेकांशी बोलू लागले. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.
जेव्हा झैद आणि गौहरच्या नात्याची बातमी समोर आली, तेव्हा गौहर झैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, खुद्द गौहरने त्यावर प्रतिक्रिया देत ही गोष्ट चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. मी झैदपेक्षा फक्त काही वर्षांनी मोठी आहे आणि या गोष्टीमुळे त्याला काही फरक पडत नाही, असं तिने स्पष्ट केलं होतं.