मला सांगताना खूप वाईट वाटतंय..; गौरव मोरेनं जाहीर केला मोठा निर्णय

| Updated on: May 08, 2024 | 1:02 PM

पवई फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा विनोदवीर गौरव मोरे याने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा निरोप घेत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

मला सांगताना खूप वाईट वाटतंय..; गौरव मोरेनं जाहीर केला मोठा निर्णय
गौरव मोरे
Image Credit source: Instagram
Follow us on

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच शोमधून अभिनेता गौरव मोरे हा ‘पवई फिल्टर पाड्याचा बच्चन’ या नावाने घराघरात पोहोचला. हास्यजत्रेमुळे गौरवच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली. आता गौरवने प्रेक्षकांना निराश करणारा निर्णय जाहीर केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून निरोप घेत असल्याचं त्याने सांगितलं आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गौरव मोरेची पोस्ट-

‘पवई फिल्टर पाड्याचा मी गौरव मोरे… आरा बाप मारतो का काय मी.. ये बच्ची.. रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं, नाव दिलं, सन्मान दिलात, त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो, असं त्याने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटलं, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो. माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील. असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे.’

गौरवच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझ्याशिवाय हास्यजत्रेत मजा नाही’, अशा शब्दांत काहींनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी त्याला निलेश साबळेंच्या नव्या शोमध्ये जाऊ नकोस, असा सल्ला दिला आहे.

याशिवाय गौरव लवकरच ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेले, दलितांच्या हक्कांसाठी लढलेले, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे दूरदर्शी नेते आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखो लोकांनी शोक व्यक्त केला होता. ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे.