मुंबई : अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत सापडली आहे. कारण लखनऊमध्ये गौरीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ज्या तुलसियानी बिल्डर्सच्या विरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे, त्याची गौरी ब्रँड ॲम्बेसेडर आहे. त्यामुळेच तिलाही या प्रकरणात ओढण्यात आलं आहे. गौरीविरोधात आयपीसी कलम 409 (गुन्हेगारी विश्वासघात) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या जसवंत शाह नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.
मुंबईतल्या जसवंत शाह यांनी तुलसियानी कंस्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट लिमिटेड अंतर्गत लखनऊच्या सुशांत गोल्फ परिसरात एक फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट जसवंत शाह यांना मिळणार होता. मात्र नंतर त्यांना समजलं की त्यांच्याऐवजी तो फ्लॅट दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आला आहे. फ्लॅटचे संपूर्ण पैसे वेळेवर देऊनसुद्धा त्यांना फ्लॅट देण्यात आला नाही, अशी तक्रार त्यांनी केली. जसवंत यांनी एकूण 86 लाख रुपये दिले होते.
तुलसियानी कंस्ट्रक्शनची ब्रँड ॲम्बेसेडर गौरी खान आहे. याच गोष्टीने प्रभावित होऊन फ्लॅट खरेदी केल्याचं जसवंत यांनी सांगितलं. म्हणूनच या प्रकरणात गौरी खानचंही नाव पुढे आलं आहे. गौरीशिवाय या प्रकरणात तुलसियानी कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे प्रधान संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि सहयोगी संचालक महेश तुलसियानी यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जसवंत शाह यांनी त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. कंपनीने ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानुसार ताबा न मिळाल्याने कंपनीने 22.70 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली आणि पुढील सहा महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचं आश्वासन दिलं. असं नाही झाल्यास व्याजासह पैसे परत करणार असल्याचा दावा कंपनीने केला होता. दरम्यान, विक्रीता करारनामा करून कंपनीने आपला फ्लॅट दुसऱ्याच्या नावावर विकल्याचं जसवंत शाह यांना समजलं. म्हणूनच त्यांनी बिल्डर्सविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यात गौरी खानचाही समावेश केला.