थलपती विजय, तृषा कृष्णन आणि प्रकाश राज यांची मुख्य भूमिका असलेला ‘घिली’ हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यातील कलाकारांच्या आणि दिग्दर्शक धरनी यांच्या करिअरमधील सर्वांत मोठा हिट चित्रपट ठरला होता. आता ‘घिली’ला 20 वर्षे झाल्यानिमित्त 20 एप्रिल रोजीपासून तो पुन्हा एकदा संपूर्ण भारतातील विविध थिएटर्समध्ये पुनर्प्रदर्शित करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या चित्रपटाला थिएटरमध्ये भरभरून प्रतिसाद दिला. हा रोमँटिक स्पोर्ट्स अँक्शनर चित्रपट पाहण्यासाठी 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांनी गर्दी केली. यामुळे ‘घिली’ला पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर यश मिळालं आहे. थलपती विजय आणि तृषा कृष्णन यांच्या या चित्रपटाने नवीन विक्रम रचला आहे.
चाहत्यांकडून मिळणाऱ्या या भरभरून प्रतिसादामुळे ‘घिली’ला अभूतपूर्व यश मिळालं आहे. पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट 21 व्या शतकात भारतातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. फक्त नऊ दिवसांत ‘घिली’ने देशभरात जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतकंच नव्हे तर ‘घिली’ने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार’ आणि 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटांच्या पुनर्प्रदर्शनाचा विक्रम मोडला आहे. ‘अवतार’ हा चित्रपट 2012 मध्ये देशभरात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी त्याने 18 कोटी रुपये कमावले होते. तर 2013 मध्ये जेव्हा ‘शोले’चा 3D व्हर्जन प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने 13 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
2024 या वर्षांत आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटांपैकी ‘घिली’ हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. कॅप्टन मिलर, अयलान आणि लाल सलाम यानंतर ‘घिली’ने सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 8 कोटी रुपयांची कमाई केली. त्यापैकी देशभरातील कमाईचा आकडा 4.75 कोटी रुपये इतका होता. घिली या चित्रपटात विजय, तृषा आणि प्रकाश राज यांच्याशिवाय आशिष विद्यार्थी, जानकी साबेश, धामू आणि तनिकेला भरनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.