गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले..

| Updated on: Oct 02, 2024 | 9:44 AM

“सध्या बाबा आयसीयूमध्ये आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. मी फारसं काही बोलू शकत नाही. पण बाबांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या असून रिपोर्ट्स ठीक आहेत," अशी माहिती गोविंदाच्या मुलीने दिली.

गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले..
अरबाज खान, गोविंदा, अर्शद वारसी
Image Credit source: Instagram
Follow us on

परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदा जखमी झाला. गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जुहू इथं गोविंदाच्या निवासस्थानी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेवर अभिनेता अरबाज खान आणि अर्शद वारसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बंदा सिंह चौधरी’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान या दोघांनी गोविंदासोबत घडलेल्या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली.

अर्शद वारसी, अरबाज खानची प्रतिक्रिया

यावेळी अर्शद वारसी म्हणाला, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. असं घडायला पाहिजे नव्हतं. आम्हा सर्वांना त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय. हे किती दुर्दैवी आहे, याचविषयी आम्ही बोलत होतो. हा अत्यंत अजब योगायोग आहे. असं घडायला पाहिजे नव्हतं, असं मला वाटतं.” तर अरबाज खान म्हणाला, “अर्शद जे म्हणाला ते योग्य आहे. ही घटना फार दुर्दैवी आहे. अर्थातच ही घटना आताच घडल्याने आम्हाला त्याविषयी फारशी माहिती नाही. पण ते सुरक्षित आणि ठीक आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आमचं प्रेम आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत हीच आमची इच्छा आहे.”

गोविंदाला गोळी कशी लागली?

मंगळवारी गोविंदा सकाळा 7 वाजताच्या सुमारास विमानाने कोलकात्याला जाणार होता. घरातून निघत असताना तो बंदूक कपाटात ठेवत होता. त्यावेळी हातातून बंदूक खाली पडली आणि बंदुकीतून एक गोळी सुटली. ती गोळी थेट गोविंदाच्या पायाला लागली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गोळी बाहेर काढली असून गोविंदाची प्रकृती आता स्थिर आहे.

हे सुद्धा वाचा

गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने याविषयी माहिती देताना सांगितलं होतं, “गोविंदाच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाही. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तो कोलकाताला जायला घरातून निघाला होता, तेव्हा ही घटना घडली. गोविंदा त्याची परवानाकृत रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता, त्याचवेळी ती चुकून खाली पडली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली लागली. डॉक्टरांनी पायातून गोळी काढली आहे. सध्या रुग्णालयात गोविंदासोबत त्याची मुलगी टीना आहे. गोविंदा सर्वांशी बोलत असून त्याची प्रकृती स्थिर आहे.”