अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदाच्या हातातील बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याची माहिती त्याच्या मॅनेजरने ‘एएनआय’शी बोलताना दिली. ही बातमी समोर येताच गोविंदाच्या चाहत्यांकडून त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली जातेय. नेमकं काय घडलं होतं आणि बंदुकीतून गोळी कशी सुटली.. असे विविध प्रश्नही नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. पहाटेच्या सुमारास गोविंदाच्या घरात नेमकं काय घडलं, त्याविषयीची माहिती त्याचा मॅनेजर शशीने दिली आहे.
“आज पहाटे 4.45 च्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा कोलकाताला जाण्यासाठी निघाला होता. घरातून बाहेर पडताना तो त्याच्याकडे असलेली परवानाधारक रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता. त्यावेळी त्याच्या हातातून ती निसटली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या पायाला लागली. डॉक्टरांनी त्याच्या पायातील गोळी काढली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे”, असं मॅनेजर शशीने सांगितलंय. मुंबई पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गोविंदाची प्रकृती स्थिर असून जखम फार गंभीर नाही, असं त्यांनी म्हटलंय.
या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली आणि आणि याप्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत. त्याचप्रमाणे गोविंदाची प्रकृती सुधारताच त्याला रुग्णालयात डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे. गोविंदावर सध्या अंधेरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गोविंदाची पहिली प्रतिक्रियासुद्धा समोर आली आहे. एका ऑडिओ क्लिपद्वारे गोविंदाने प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या पायाला गोळी लागली होती आणि ती काढण्यात आली आहे. मी डॉक्टरांचे आणि सर्व चाहत्यांचे खूप आभार मानतो. तुमच्या प्रेमासाठी आणि तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो”, असं तो या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतोय. पायातून गोळी काढल्यानंतर गोविंदाने हा ऑडिओ रेकॉर्ड केला आहे. त्याद्वारे त्याने प्रकृतीची माहिती दिली आहे.
Govinda admitted to hospital after suffering accidental bullet injury, manager confirms he’s stable
Read @ANI story | https://t.co/MXAbKIoQ2K#Govinda #bulletinjury #hospitaladmit pic.twitter.com/pCoEYgSKru
— ANI Digital (@ani_digital) October 1, 2024
अंधेरीतल्या क्रिटीकेअर रुग्णालयात गोविंदावर उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. गोविंदा गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. 2019 मध्ये त्याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही. मात्र विविध कार्यक्रमांमध्ये त्याची उपस्थिती पहायला मिळतेय.
या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री दिली आहे. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत”, असं ते म्हणाले.