अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. लग्नाच्या 37 वर्षांनंतर हे दोघं विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सुनिताने सहा महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, असा खुलासा गोविंदाच्या मॅनेजरने केला होता. मात्र त्यानंतर दोघांनी मतभेद दूर करण्यासाठी पावलं उचलल्याचंही त्याने स्पष्ट केलं. अशातच गोविंदा आणि सुनिताच्या लग्नाचे किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोविंदाच्या आईने सुनिताबद्दल त्याला कोणता इशारा दिला होता, याविषयी तो या मुलाखतीत सांगताना दिसतोय.
या व्हिडीओमध्ये गोविंदाने सांगितलं की जरी त्याने सुनितावर प्रेम केलं असलं तरी त्याची आई तिला खूप पसंत करायची. आईच्या परवानगीनंतरच त्याने सुनिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. “माझ्या आईनंतर सुनिता.. त्या कमी वयात माझ्या संपूर्ण कुटुंबाची आई बनली होती. माझा स्वभाव असा होता की जे आई म्हणेल, ते मी करणार. माझ्या आईसमोर कोणाचंच काही चालायचं नाही. आईने मला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, जर तू तिची फसवणूक केलीस तर भीक मागशील. इतकं वाईट ती मला बोलली होती की काय सांगू? त्यावर मी तिला म्हणालो की, आई तू तिच्यावर इतकं प्रेम करतेस. आई म्हणायची की, ती खूप चांगली आहे, ती घराची लक्ष्मी आहे. माझी आई सुनिताला लक्ष्मी स्वरुप मानायची. हे खरंच आहे. ज्या दिवशी ती माझ्या घरात आली, तेव्हापासून मी मागे वळून पाहिलं नाही”, असं गोविंदाने सांगितलं.
गोविंदा आणि सुनिता यांनी 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं होतं. या दोघांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत. बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात झाल्यानंतर गोविंदाने सुनिताशी गुपचूप लग्न केलं होतं. कोणाला याची कानोकान खबर लागू दिली नव्हती. मात्र सुनिताला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या लग्नाबद्दलच्या बातम्या समोर आल्या होत्या.