अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांशी बोलत नाहीत. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. याच पोस्टवरून हा वाद सुरू झाला होता. ‘काही लोक पैसे घेऊन लग्नात नाचतात’, असं तिने लिहिलं होतं. यावरून गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या दोघींनी एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर आता भाजी आरती सिंहच्या लग्नात गोविंदाने उपस्थित राहून वाद मिटवल्याचे संकेत दिले. या लग्नसोहळ्यात कश्मीरा गोविंदाच्या पाया पडली. तर गोविंदाने कृष्णा आणि कश्मीराच्या मुलांना जवळ घेतलं, त्यांना आशीर्वाद दिला. अशातच गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या मुलाखतीत गोविंदाने वादामागील कारण सांगितलं आहे.
गोविंदा म्हणाला, “कृष्णाला जेव्हा मुलं झाली तेव्हा मी त्यांना बघायला रुग्णालयात गेलो होतो. माझ्यासोबत माझी पत्नी सुनीतासुद्धा होती. आम्ही त्याच्या मुलांना लांबून तर पाहिलं होतं, पण आम्हाला त्यांच्या जवळ जाण्याची परवागनी नव्हती. आम्ही मुलांना जवळून पाहण्याचा आणि त्यांनी उचलून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला रोखलं गेलं होतं. कदाचित इन्फेक्शनमुळे त्यांनी नकार दिला असेल, असं मला वाटलं होतं. ही गोष्ट मी त्याला चार वेळा सांगितली की मी तुझ्या मुलांना भेटून आलो आहे. तरीसुद्धा तो ते मानायलाच तयार नाही.”
“तो कोणत्याही मुलाखतीत फक्त हेच म्हणतो की मामा माझ्या मुलांना बघायला आले नाहीत,” अशी खंत गोविंदाने बोलून दाखवली. याच कारणामुळे मामा-भाचाच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि पुढे ती वाढत गेली. कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद हा कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे सुरू झाला होता. 2016 मध्ये कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्याने भाच्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीराने एक ट्विट केलं होतं. ‘काही लोक पैशांसाठी डान्स करतात’, असं तिने ट्विटद्वारे टोमणा मारला होता. गोविंदाची पत्नी सुनिताला असं वाटलं की कश्मीराने हे ट्विट त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलंय. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला.
मामा-भाचामध्ये वाद जरी झाला तरी काही वर्षांनी कृष्णाला ही गोष्ट जाणवली की आपल्या जवळची नाती ही कायम आपल्यासोबत असली पाहिजेत. म्हणूनच गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने मामाची माफी मागितली होती. “मी त्यांची माफी मागतो आणि माझ्या चुकीसाठी मी त्यांच्या पायासुद्धा पडायला तयार आहे. रक्ताची नाती अशीच संपुष्टात येत नाहीत”, असं तो म्हणाला होता.