मुंबई : बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारलेले अभिनेते गुफी पेंटल यांचं आज (सोमवार) सकाळी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. 31 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुफी यांच्या कुटुंबीयांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हृदय निकामी झाल्याने सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गुफी यांनी टेलिव्हिजनसोबतच चित्रपटांमध्येही काम केलं होतं. 1980 च्या दशकात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी ते इंजीनिअर होते. बी. आर. चोपडा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतून त्यांना खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्यांनी शकुनी मामाची भूमिका साकारली होती.
बीआर चोपडा यांची ‘महाभारत’ ही मालिका त्याकाळी खूप गाजली होती. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. या मालिकेतील भूमिकांसाठी अनेक कलाकारांचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. विशेष म्हणजे शकुनी मामा साकारणारे गुफी पेंटल हेच मालिकेचे कास्टिंग डायरेक्टरसुद्धा होते. त्यांनीच मालिकेतील इतर कलाकारांची निवड केली होती. महाभारत या मालिकेशिवाय त्यांनी श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपटही दिग्दर्शित केला होता.
गुफी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिल्लगी (1978), देस परदेस (1978), दावा (1997) आणि सम्राट अँड को. (2014) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुहाग’ या चित्रपटात त्यांनी अक्षय कुमारच्या काकाची भूमिका साकारली होती. महाभारताशिवाय त्यांनी ‘भारत के वीर पुत्र- महाराणा प्रताप’, ‘मिसेस कौशिक की पाँच बहुएँ’, ‘कर्मफल दाता शनी’ आणि ‘कर्ण संगिनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. शेवटचे ते ‘जय कन्हैय्या लाल की’ या मालिकेत झळकले होते.