अभिनेता आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान ‘महाराज’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने ‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली आहे. हिंदू धर्मातील वैष्णव पंथाच्या पुष्टीमार्गच्या अनुयायांनी त्यांच्या धार्मिक भावा दुखावल्याचा दावा करत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती संगीता विषेन यांच्या एकल न्यायाधीशाच्या खंडपीठाने गुरूवारी प्रदर्शनाच्या स्थगितीचा आदेश दिला. हा चित्रपट आज (शुक्रवारी) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. इतकंच नव्हे तर खंडपीठाने नेटफ्लिक्स आणि चित्रपटाचे निर्माते यश राज फिल्म्स यांनाही नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 18 जून रोजी होणार आहे.
पुष्टीमार्ग पंथाच्या आठ सदस्यांनी या चित्रपटाविषयीचा लेख वाचल्यानंतर त्याच्या प्रदर्शनाविरोधात याचिका दाखल केली. जुनैदचा हा चित्रपट 1862 च्या प्रसिद्ध महाराज लायबल केसवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि पंथाच्या अनुयायांविरोधा हिंसाचार भडकण्याची शक्यता आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील मिहीर जोशी यांनी सांगितलं की हा चित्रपट 1862 च्या लायबल केसवर आधारित आहे, ज्याची सुनावणी आणि निर्णय ब्रिटीश न्यायाधीशांनी घेतला होता. अत्यंत निंदनीय आणि बदनामीकारक भाषा असलेल्या न्यायालयाच्या निकालातील संदर्भ या चित्रपटात देण्यात आला असून त्यामुळे संप्रदायाच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जातील, असं ते पुढे म्हणाले.
याचिकाकर्त्यांनी ही बाबसुद्धा निदर्शनास आणून दिली की ब्रिटीश काळातील न्यायालयाने मानहानीच्या खटल्याचा निर्णय दिला होता. त्यावेळी त्यांनी हिंदू धर्माची निंदा केली होती. तसंच भगवान कृष्ण यांच्या भक्तीगीतांवर आणि भजनांवर निंदनीय टिप्पणी केली होती. ‘महाराज’ या चित्रपटाच्या कथेबद्दल कोणाला समजू नये यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट कोणत्याही ट्रेलर प्रदर्शनाशिवाय आणि प्रमोशनशिवाय गुप्तपणे करण्याचा प्रयत्न केला, असाही युक्तिवाद त्यांनी केला.
याआधी याचिकाकर्त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी संपर्क साधून चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा कार्यवाही झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास पुष्टीमार्ग पंथाविरोधात द्वेष आणि हिंसा भडकण्याची शक्यता आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.