मुंबई: कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. आठ वर्षांच्या गुंजन सिन्हाने या शोचं विजेतेपद पटकावलं. शो मधील गुंजनचा 12 वर्षांचा डान्स पार्टनर तेजस आणि कोरिओग्राफर सागर यांचाही सन्मान करण्यात आला. बक्षीस म्हणून या तिघांना 20 लाख रुपये मिळाले. मात्र आता सोशल मीडियावर ‘झलक दिखला जा’च्या निर्मात्यांना ट्रोल केलं जातंय. यामागचं कारण काय ते जाणून घेऊयात..
गुंजनसोबत रुबिना दिलैक आणि फैजल शेख हे दोघं ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. हे दोघंही तगडे स्पर्धक असल्याने त्यांच्यापैकी एखादा विजेता ठरेल असा प्रेक्षकांचा अंदाज होता. मात्र परीक्षकांनी गुंजनला विजेती ठरवल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
विजेत्याचं नाव घोषित करण्याआधी परीक्षक करण जोहरने सांगितलं की, “डान्स रिॲलिटी शोच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड फिनालेमध्ये अशी गोष्ट घडतेय. ‘झलक दिखला जा 10’च्या तिन्ही स्पर्धकांमध्ये बरोबरीचा सामना झाला आहे. मात्र इंटरनॅशनल डान्स फॉरमॅटचा विचार करून आम्ही विजेता ठरवतोय.”
आठ वर्षांच्या गुंजनचा जन्म 2014 मध्ये गुवाहाटीमध्ये झाला. आपल्या दमदार नृत्य कौशल्याच्या जोरावर अत्यंत कमी वयात गुंजनने नाव कमावलं. गुंजनचे वडील रणधीर सिन्हा हे पोलीस अधिकारी आहेत तर आई हिमाद्री गृहिणी आहे. अत्यंत कमी वयापासूनच गुंजनने नृत्याचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. डान्स दिवाने ज्युनिअर या शोमध्ये तिने कोरिओग्राफर सागर बोरा याच्यासोबत भाग घेतला होता. या शोच्या ग्रँड फिनालेपर्यंत गुंजन पोहोचली होती. मात्र ती हा शो जिंकू शकली नव्हती.