कुठे बेपत्ता झाले तारक मेहतामधील सोढी, पोलिसांकडून अजूनही शोध सुरुच

| Updated on: May 10, 2024 | 9:29 PM

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह 22 एप्रिलपासून अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पण अद्याप त्यांची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तपासादरम्यान पोलिसांना गुरुचरण सिंगशी संबंधित काही महत्त्वाचे क्लूस मिळाले आहेत. त्यावरुन त्याचा शोध सुरु आहे.

कुठे बेपत्ता झाले तारक मेहतामधील सोढी, पोलिसांकडून अजूनही शोध सुरुच
Follow us on

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याचा अद्याप शोध लागलेला नाही. 22 एप्रिलपासून तो बेपत्ता होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. अभिनेता गुरुचरण सिंगचा शोध घेत असलेल्या दिल्ली पोलिसांनी आता खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुचरण सिंग 10 पेक्षा जास्त बँक खाती आणि 27 ईमेल आयडी वापरत होता. त्याच्यावर कोणीतरी नजर ठेवत असल्याचा त्याला संशय आला. या शंकेमुळे तो अनेकदा आपले ईमेल खाते बदलत राहिला. त्याचा धर्माकडे कल थोडा वाढल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.

२२ एप्रिलपासून बेपत्ता

कुटुंबीय, मित्र आणि पोलीस सर्वजण अभिनेता गुरुचरण सिंगच्या शोधात आहेत. 22 एप्रिल संध्याकाळी तो मुंबईला रवाना झाला होता. मात्र तो त्याच्या घरी पोहोचला नाही. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने पालम येथे राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर २६ एप्रिल रोजी पालम पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३६५ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली.

अभिनेत्याचे मोबाईल फोनवरून लोकेशन ट्रेस करण्यासाठी पोलिसांनी एक टीम नेमली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग यांचा मोबाइल फोन २२ एप्रिल रोजी रात्री ९.२२ वाजल्यापासून बंद आहे.

गुरुचरण सिंगचे शेवटचे लोकेशन दिल्लीत

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो अखेरचा दक्षिण-पश्चिम दिल्लीतील डाबरी येथे दिसला होता. जिथे त्याने IGI विमानतळाजवळून ई-रिक्षा घेतली. अभिनेत्याकडे दोन मोबाईल फोन होते पण त्यापैकी एक दिल्लीतील त्याच्या घरी सोडला होता. त्याने शेवटचा कॉल त्याच्या मित्राला केला, जो त्याला मुंबई विमानतळावर घेण्यासाठी जात होता.

पोलीस पथकांनी त्याचे बँक खाते आणि क्रेडिट कार्ड व्यवहार तपासले आणि ते बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी त्याने शेवटचे 14,000 रुपये एटीएममधून काढल्याचे आढळले. गुरुचरण सिंग यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर बरीच कर्जे होती. गुरुचरण सिंगचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि विशेष सेलची किमान डझनभर पोलीस पथके काम करत आहेत.