अभिनेता गुरमीत चौधरी आणि डेबिना बॅनर्जी यांनी ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेतून या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेत काम करता करता गुरमीत आणि डेबिना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. एप्रिल 2022 मध्ये डेबिनाने मुलीला जन्म दिला. त्याच वर्षी डेबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. डेबिनाच्या दुसऱ्या मुलीचा जन्म डिलिव्हरीच्या वेळेआधीच झाला. गुरमीत आणि डेबिना हे त्यांच्या युट्यूब चॅनलवरील विविध व्लॉग्सद्वारे खासगी आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असतात. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत असतो. अशातच काही युजर्सनी डेबिनाला एका मुलीसोबत पक्षपातपणे वागल्याची टीका केली. या टीकेवर आता गुरमीतने मौन सोडलं आहे.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गुरमीतने सांगितलं की अशी टीका ऐकल्यावर डेबिनाला खूप वाईट वाटतं. गुरमीत आणि डेबिनाला लियाना आणि दिविशा या दोन मुली आहेत. या दोघींचा जन्म एकाच वर्षी झाला. लियानाच्या तुलनेत दिविशाच्या बाबतीत ते अधिक प्रेमाने आणि काळजीपूर्वक वागतात, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. यावर गुरमीत म्हणाला, “डेबिनाला याविषयी खूप वाईट वाटतं. एक आई तिच्या मुलांसोबत पक्षपात करू शकते, असा विचारच लोक कसं करू शकतात?”
“मूर्ख लोकच अशा पद्धतीचा विचार करू शकतात. डेबिनाला त्या लोकांविषयी वाईट वाटतं. मी तिला हेच सांगतो की ट्रोल करणारे लोक बेरोजगार असतात. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी ते कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कमेंट्सचा आपल्या आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही. मी अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करतो. अशा गोष्टींमुळे स्वत:बद्दल का प्रश्न उपस्थित करायचे? मला सकारात्मक कमेंट्स वाचायला आवडतात”, असं तो पुढे म्हणतात.
पहिल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच गरोदर झाल्यानेही डेबिनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. एका मुलाखतीत डेबिना तिच्या प्रेग्नंसीविषयी, त्यातील अडचणींविषयी आणि आयव्हीएफविषयी (IVF) मोकळेपणे व्यक्त झाली होती. डेबिनाने 2011 मध्ये अभिनेता गुरमीत चौधरीशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर डेबिनाला गरोदरपणात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अखेर एप्रिल 2022 मध्ये तिने IVF द्वारे (इन विट्रो फर्टिलायजेशन) मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती नैसर्गिक पद्धतीने गरोदर झाली.