प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या वहिनीने तिच्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. हंसिकाच्या वहिनीचं नाव मुस्कान नॅन्सी जेम्स असं असून तिने हंसिका आणि तिची आई ज्योती मोटवानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “हंसिका आणि तिच्या आईने माझ्या वैवाहिक आयुष्यात इतकी ढवळाढवळ केली आहे, ज्यामुळे माझ्या आणि पतीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे”, असं तिने म्हटलंय. मुस्कानने पती प्रशांत मोटवानीवरही कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. 18 डिसेंबर रोजी तिने मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात सेक्शन 498A, 323, 504, 506 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 34 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. वहिनीच्या या आरोपांनंतर हंसिकाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मुस्कान नॅन्सी जेम्सने हंसिकाचा भाऊ प्रशांत मोटवानी याच्याशी 2020 मध्ये लग्न केलं होतं. ‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार मुस्कानने तिची नणंद, सासू आणि पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. नणंद हंसिका आणि सासू ज्योती यांच्यावर तिने संसारात ढवळाढवळ केल्याचा आरोप केला आहे. या दोघींमुळे पतीसोबतच्या नात्यात कटुता आल्याचा दावा मुस्कानने केला आहे. इतकंच नव्हे तर हे लोक महागड्या भेटवस्तू आणि पैशांची मागणी करत असल्याचाही आरोप मुस्कानने केला. त्याचसोबत प्रॉपर्टीशी संबंधित फसवणुकीतही ते सामील असल्याचं तिने म्हटलंय. “कौटुंबिक हिंसाचारामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. मला बेल्स पाल्सीचा त्रास जाणवू लागला आहे”, असं तिने सांगितलं आहे. बेल्स पाल्सी झालेल्यांना चेहऱ्याच्या पक्षाघाताचा त्रास जाणवतो. गेल्या दोन वर्षांपासून मुस्कान आणि प्रशांत वेगळे राहत असल्याचं समजतंय.
वहिनीच्या या आरोपांदरम्यान हंसिकाची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये हंसिकाने नमूद केलंय की ती ड्रामा आणि अपयशांमध्ये अडकून बसण्याचं तिचं वय निघून गेलं आहे. ती आता आयुष्याच्या सकारात्मक बाजूकडे परत येण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. हंसिकाची ही पोस्ट वहिनीच्या आरोपांनंतर असल्याने त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.