मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा यांच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटातील चिमुकली मुलगी आठवतेय का? याच मुलीने मोठं झाल्यानंतर बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे हंसिका मोटवानी. लहानपणी हंसिकाने ‘कोई मिल गया’ चित्रपटात साकारलेली भूमिका आजही चाहत्यांना चांगलीच लक्षात असेल. हंसिका बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं करिअर प्रस्थापित करत असतानाच तिच्याविषयी विचित्र अफवा पसरू लागल्या होत्या. ती लवकर मोठी व्हावी किंवा वयापेक्षा मोठी दिसावी यासाठी आईने तिला हार्मोनल इंजेक्शन दिल्याची ही अफवा होती. या अफवांवर हंसिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे.
हंसिका म्हणाली, “त्या अफवांमुळे माझ्यावर काही परिणाम झाला होता की नाही हे मला आता आठवत नाही. मला त्या अफवांशी काहीच घेणंदेणं नव्हतं. कारण जर तुम्ही माझ्याबद्दल बोलत असाल तर नक्कीच मी तुमच्यासाठी महत्त्वाची असेन. मात्र त्या अफवांचा माझ्या आईवर खूप परिणाम झाला होता. मी तर सर्वकाही विसरले होते, पण माझी आई त्या गोष्टींना विसरू शकली नाही. सोशल मीडियावर तुम्हाला काहीही बोलायचं स्वातंत्र्य असलं तरी त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाबद्दल काहीही बोलू शकता. लोक जे काही बोलतात, त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होतो.”
90 च्या दशकात हंसिका मोटवानी ‘शका लका बूम बूम’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती. याशिवाय तिने हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. मात्र ती जेव्हा चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून झळकू लागली, तेव्हा लोकांना ते अशक्य वाटलं. हंसिकाच्या आईने तिला हार्मोन्सचे इंजेक्शन्स दिले, अशी चर्चा सुरू झाली.
याआधी हंसिकाच्या आईनेही या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. हंसिकाची आई स्वत: एक डर्मेटोलॉजिस्ट आहेत. मुलीबद्दलच्या या अफवांमुळे सुरुवातीला खूप वाईट वाटायचं असं त्या म्हणाल्या होत्या. “मार्केटमध्ये खरेच असे इंजेक्शन्स असतात का? जर असते तर मी स्वत: गरजूंना ते विकले असते आणि श्रीमंत झाली असती. कोणती आई तिच्या मुलीसाठी असं काम करेल,” असा सवाल त्यांनी ट्रोलर्सना केला होता.