मुंबई : 26 जानेवारी 2024 | मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. मूळ तेलुगू भाषेतील या चित्रपटाला हिंदीसह इतर भाषांमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशांत वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता तेजा सज्जाने मुख्य भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक प्रशांत यांनी शूटिंगदरम्यानचा असा एक किस्सा सांगितला, जेव्हा तेजा सज्जाचा जीव धोक्यात आला होता. हनुमानानेच आमची रक्षा केली, असंही त्यांनी म्हटलंय.
चित्रपट बनवण्याच्या संपूर्ण प्रवासात कधी दैवी अनुभव आला का, असा प्रश्न प्रशांत यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की ‘हनुमान’च्या प्री-प्रॉडक्शनच्या आधीपासूनच त्यांना तशी अनुभूती येत होती. त्यांनी सांगितलं की बरेच लोक त्यांची भेट घेऊन त्यांना हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी आणि श्लोक वाचण्यासाठी आवाहन करायचे. मात्र टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना दैवी शक्तींवर विश्वास निर्माण होऊ लागला, असं ते म्हणाले. “सुरुवातीला मला असं वाटलं होतं की प्रत्येकजण फक्त माझ्या तांत्रिक ज्ञानामुळे कौतुक करतोय. पण एका व्यक्तीने मला सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय का हे सर्व तुम्ही करत आहात? नाही, हे सर्व तोच करतोय. तेव्हा मला सगळ्या घडामोडी एकमेकांशी जुळलेल्या असल्याचं जाणवलं”, असं प्रशांत यांनी सांगितलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “सेटवर अशा अनेक घटना घडल्या होत्या, जेव्हा मोठा अपघात होऊ शकला असता. मात्र त्या सर्व दुर्दैवी घटना टळल्या होत्या. इतकंच काय तर तेजाचे प्राणही जाऊ शकले असते. अभिनेत्रीचाही जीव धोक्यात आला होता. जर तुम्हाला चित्रपटातील एक सीन आठवत असेल तर त्यात तेजा वाघापासून दूर उडी मारून एका दगडामागे लपत असल्याचं दाखवलंय. त्यावेळी त्याच्या मागे कोब्रा जवळपास दहा ते पंधरा मिनिटे होता. मात्र कोब्राने त्याला काहीच केलं नाही. तो अत्यंत विषारी साप होता. आम्ही सगळे स्तब्ध झालो होतो आणि थोड्या वेळाने तो तिथून निघून गेला. त्यानंतर आम्ही शूटिंग पूर्ण केलं होतं.”
शूटिंगदरम्यान आलेल्या या सर्व अनुभवांमुळे प्रशांत यांनी चित्रपटाच्या श्रेयनामावलीत एक ओळ समाविष्ट केली. त्यात लिहिलं होतं, ‘मी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय, पण माझ्या मते हनुमानजी या चित्रपटाचे खरे दिग्दर्शक आहेत.’ गेल्या 13 दिवसांत या चित्रपटाने तब्बल 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये तेजा सज्जासोबतच अमृता अय्यर, विनय राय, वेन्नेला किशोर आणि राज दीपक शेट्टी यांच्या भूमिका आहेत.