गोविंद ठाकूर, टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी : मुंबई | अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंज केलं. आजही बिग बी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. बिग बी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तर त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते ‘जलसा’ बंगल्या बाहेर जमले होते. मंगळवारी रात्रीपासून त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देण्यासाठी देशातील विविध राज्यातून लोक त्यांच्या घराबाहेर आले आहेत. आणि प्रत्येकाला अमिताभ बच्चन यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा आहे. सध्या सर्वत्र बिग बी यांची चर्चा रंगली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत बिग बी यांच्या चाहत्यांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. बिग बी यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. रात्री बिग बी यांनी देखील ‘जलसा’च्या गेटवरून चाहत्यांना अभिवादन केलं. बिग बी यांच्या घराबाहेर चाहते त्यांच्या गाण्यांवर नाचत आहेत. तर कोणी अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांमधील गाणी बोलताना दिसत आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा आणि जलसा निवासस्थानाबाहेर मिलिंद नार्वेकर यांनी होर्डिंग्ज लावून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनयाचा डॉन असा होर्डिंग्जवर उल्लेख केला आहे.
एवढंच नाही तर. अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील होर्डिंग्जवर लावण्यात आला आहे. सांगायचं झालं तर मिलिंद नार्वेकर हे अमिताभ बच्चन यांचे चाहाते आहे. दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घराबाहेर शुभेच्छांचे होर्डिंग लावतात. सोशल मीडियावर देखील कायम अमिताभ बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. बिग बी कायम त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटन सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्यामुळे जगभातील चाहते त्यांच्या शुभेच्छा देत आहेत.