Farah Khan Birthday | फराह खान या नावाला कोण ओळखत नाही. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर फराह खान यांनी महिला असूनदेखील बॉलीवूडमध्ये नाव कमवलं आहे. आज पूर्ण भारत त्यांना एक कोरिओग्राफर, दिग्दर्शक, निर्मात्या तसेच अभिनेत्री म्हणून ओळखतो. आज या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे. फराह खान आज 56 वर्षांच्या झाल्या आहेत. याच निमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
फराह खान यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव मेनका आहे. फराह यांचे शिक्षण मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून झाले. त्यांनी येथे सोशियोलॉजीची पदवी पूर्ण केली. या काळात त्या जगप्रसिद्ध डान्सर मायकल जॅकस्नच्या नृत्याने प्रभावित झाल्या. नंतर पुढे नृत्यकलेमध्येच आपले करिअर करण्याचे त्यांनी ठरवले. डान्स शिकण्यासाठी त्यांनी कोठेही प्रशिक्षण घेतलेले नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी डान्सिंगवर प्रभुत्व मिळवलेले आहे. 2004 साली फराह यांनी शिरीष कुंदर यांच्यासोबत लग्न केले. या जोडीला आज तीन मुलं आहेत. शिरीष कुंदर हे प्रसिद्ध असे चित्रपट दिग्दर्शक आहेत.
फराह खान यांच्या करिअरची सुरुवात सरोज खान यांनी चित्रपट सोडल्यानंतर झाली. त्यावेळी जो जिता वही सिकंदर या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांच्याकडे होते. मात्र त्यांनी अचानकपणे हा चित्रपट सोडला. नंतर फराह खान यांच्याकडे हा चित्रपट आला. या एका संधीचे त्यांनी सोने करत नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. फराह खान यांची शाहरुख खानशी चांगलीच मैत्री आहे. कभी हां कभी ना या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. नंतर या जोडीने अनेक चित्रपट सोबत केले.
फराह खानने कोठेही डान्सचे प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केलेले आहे. यातील अनेक गाणे हे भन्नाट आणि लोकप्रिय आहेत. त्यांना आतापर्यंत पाच वेळा उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे. फराह यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केलेले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले मैं हूं ना, ओम शांती ओम हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. मात्र तीस मार खानसारखे काही फ्लॉप चित्रपटदेखील फराह खान यांच्या नावावर आहेत.
फराह खान यांनी छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम केले आहे. इंडियम आयडॉलच्या सीझन 1 आणि 2 मध्ये त्या जज होत्या. तसेच जो जीता वही सुपरस्टार, एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा, डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर अशा अनेक डान्स शोमध्ये त्यांनी जज म्हणून आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा आलेख असाच उंचावत जावो. टीव्ही 9 मराठीकडून त्यांनी खूप खूप शुभेच्छा.
इतर बातम्या :
Pushpa The Rise | ’83’ला ओव्हरटेक करत पुष्पाच्या हिंदी वर्जनचा धुमाकूळ, तब्बल 73 कोटीची कमाई